संपूर्ण भारतात साखर उत्पादनाबरोबरच साखर निर्यातीत महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. पाच वर्षांत एकूण निर्यातीच्या ४० टक्क्यांहून अधिक साखरेची निर्यात महाराष्ट्रातून झाली आहे. यंदा महाराष्ट्राने एक लाख कोटीहून अधिक रुपयांची साखर निर्यात करून साखर उद्योगात नवा विक्रम केला आहे. महाराष्ट्रात 2022-23 मध्ये केवळ 14.87 लाख हेक्टरवर उसाचे पीक घेण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रात 1413 लाख टन उसाचे उत्पादन झाले. त्यापैकी 1053 लाख टन उसाचे गाळप करून त्यातून 105.30 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर (Sugar) उत्पादन घटले आहे. असे असले तरी निर्यातीत राज्याने मोठा पल्ला गाठला आहे. राज्यातील साखर उद्योगात यंदाच्या वर्षात १ लाख ८ हजार कोटींची वार्षिक उलाढाल झाली आहे.
दरम्यान, राज्याचे साखर आयुक्त गायकवाड हे येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनतर्फे (विस्मा) शुक्रवारी (ता. २६) गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात गायकवाड यांनी ‘महाराष्ट्र राज्य साखर उद्योगाचा भविष्यवेध’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीवर खंत व्यक्त केली. यासह येत्या काही वर्षात महाराष्ट्र साखर उद्योगाचे जागतिक नेतृत्व करण्याचा विश्वासही व्यक्त केला.
शेखर गायकवाड म्हणाले, “अनेक सरकारी अधिकाऱ्यांना मागच्या फाइल बघून पुढची कामे करण्याची सवय असते. त्यांनी समोर येणाऱ्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून कामे मार्गी लावण्याची सवय आत्मसात करावी. सरकारी पातळीवरील कामात नावीन्यपूर्ण गोष्टींचा अवलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. साखर कारखान्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.”
गायकवाड यांनी राज्याला साखर उद्योगात चांगले भवितव्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “आजपर्यंत साखर उद्योगात शंभरपेक्षा जास्त नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्यातील साखर उद्योगात यंदाच्या वर्षात १ लाख ८ हजार कोटींची वार्षिक उलाढाल झाली आहे. आगामी तीन वर्षात हीच उलाढाल अडीच लाख कोटींपर्यंत जाऊ शकते. यामुळे भविष्यात महाराष्ट्राला साखर उद्योगाचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी मिळेल.