विठ्ठलाच्या खजिन्यात नोटांचे प्रमाण अत्यल्प; दोन हजाराच्या केवळ एवढ्याच नोटा

0
1

भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेत बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नागरिकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. मात्र या निर्णयानंतर अनेक प्रश्न देखील उपस्थित होत असून, राज्यातील धार्मिक स्थळांच्या दानपेटीत जमा झालेल्या दोन हजारांच्या नोटांचं काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र असे असताना विठ्ठल मंदिराला मात्र यामुळे कोणताही फरक पडणार नसणार नसल्याचं दिसून येत आहे. कारण विठुरायाच्या खजिन्यात येणाऱ्या दानामध्ये दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे समोर आले आहे.

वर्षभरात देशभरातून दीड ते दोन कोटी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार भाविक भरभरून दान विठुरायाच्या चरणावर अर्पण करीत असतात. मात्र या दानामध्ये दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण खूपच कमी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दोन हजाराच्या नोटा बंद जरी झाल्या तरी विठ्ठल मंदिर प्रशासनाला यामुळे फार डोकेदुखी होणार नाही. विशेष म्हणजे गेल्या दीड महिन्यात विठ्ठलाच्या खजिन्यात दोन हजाराच्या केवळ 70  नोटा आल्या आहेत. वर्षभरात केवळ आषाढी, कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रेतच याचे परिणाम अधिक असते.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

देवाच्या हुंडी पेटीत पाचशे, दोनशे, शंभर, पन्नास आणि दहाच्या नोटांची संख्या लक्षणीय असते. गेल्यावेळी नोटबंदी झाल्यानंतर मंदिराकडे असलेल्या हजार आणि पाचशेच्या सर्व नोटा बँकांनी बदलून दिल्या होत्या. मात्र बँकांनी बंद झालेल्या नोटा घेणे बंद केल्यानंतरही अनेक भाविक या जुन्या नोटा पेटीत  टाकताना दिसून आले होते. सध्या मंदिराकडे नोटबंदीनंतर पेटीत टाकलेल्या जवळपास पाच ते सहा लाखांच्या जुन्या नोटा शिल्लक आहेत. आताही दोन हजाराच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतरच्या पुढच्या काळात अशा नोटा देवाच्या पेटीत पुन्हा सापडू शकतील. सध्या तरी मंदिराकडे दोन हजाराच्या नोटा कमीच येत असल्याने, या नोटा बंद जरी झाल्या तरी विठ्ठल मंदिराला कोणतीही अडचण येणार नाही.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

2000 च्या नोटेचा उद्देश पूर्ण झाला: आरबीआय

आरबीआयने जारी केलेल्या निर्णयानुसार, 2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. इतर मूल्यांच्या नोटा बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर हे उद्दिष्ट साध्य करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.