शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ‘मविआ’ची खलबतं; जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा

0

कर्नाटक विधानसभेत महाशक्ती भाजपचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. या निकालाला चोवीस तास उलटत नाहीत तोवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ‘मविआ’च्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली.

कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपचे पानिपत करण्यासाठी मविआची ‘वज्रमूठ’ भक्कमपणे बांधण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. यासाठीची आगामी रणनीती आखताना, ठाकरे गटावरील अन्याय आणि न्यायालयाचा निकाल सामान्य जनतेपर्यंत पोचविण्याची आखणी करण्यात आल्याचे कळते. तर, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी ‘मविआ’चे जागावाटप करण्याबाबतही प्राथमिक चर्चा झाली.
या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील, अशोक चव्हाण, जयंत पाटील, संजय राऊत, भाई जगताप हे नेते उपस्थित होते.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत जयंत पाटील, संजय राऊत आणि नाना पटोले यांनी माहिती दिली. जयंत पाटील म्हणाले की, उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.
भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. याशिवाय महाविकास आघाडीचे एकत्रित संघटन व ठाम पर्याय महाराष्ट्राला सक्षमपणे देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे यावर एकमत आजच्या बैठकीत झाल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून अधिक मोठ्या संख्येने आणि ताकदीने महाविकास आघाडी पुढच्या काळात काम करेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कर्नाटकच्या निकालाने दिशा दाखविली: पवार

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

‘काँग्रेसने कर्नाटकमध्ये जशी शक्ती दाखवली आणि भाजपला पराभूत केले, त्याचप्रमाणे प्रादेशिक विरोधी पक्षांनी मेहनत केली पाहिजे. कर्नाटक निकालाने एक संदेश दिला असून, सर्व विरोधी पक्षांना रस्ता दाखवला आहे,’ अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. भाकपचे ज्येष्ठ नेते डी. राजा यांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेससह देशभरातील सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज डी. राजा यांनी व्यक्त केली. तसेच यासाठी पवारांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. इतर राज्यांत जनतेसमोर किमान समान कार्यक्रम घेऊन जाणार आहोत, लवकरच विरोधकांच्या गाठीभेटी होतील, असे पवारांनी सांगितले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता