खडकवासला प्रकल्पात ४ धरणांमध्ये आजअखेर एवढा पाणीसाठा शिल्लक! …सविस्तर माहिती

0

पुणे – पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये आजअखेर ९.७८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात केवळ ०.१३ टीएमसीने घट झाली आहे. खडकवासला प्रकल्पांत सध्या पुणे शहराला येत्या १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

खडकवासला प्रकल्पात खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत ही चार धरणे येतात. या चार धरणांची मिळून एकूण पाणी उपयुक्त पाणीसाठा हा ३१.२७ टीएमसी इतका आहे. यापैकी सुमारे निम्मा पाणीसाठा हा सिंचनासाठी राखीव असतो. याशिवाय काही पाण्याचे बाष्पीभवन होत असते. पुणे शहराला दरमहा सुमारे दीड टीएमसी पाणी आवश्‍यक असते.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

परंतु, उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आणखी २३ गावे ही गेल्या वर्षी महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी लागत असल्याचे जलसंपदा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

दरम्यान, खडकवासला धरणातून दौंड नगरपालिका आणि ग्रामीण भागातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. याशिवाय उन्हाळी पिकांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात येते. दिले जाते. या उन्हाळी आवर्तनासाठी आवश्‍यक असणारे पाणी या सर्वांची गोळाबेरीज करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारे पाणी पाहता, पुणे शहराला येत्या १५ जुलैपर्यंतच पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक राहत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा

टेमघर धरणाचा एकूण उपयुक्त पाणीसाठा हा ३.७१ टीएमसी, वरसगाव धरणांचा १२.८२ टीएमसी, पानशेतचा १२.७७ टीएमसी आणि खडकवासला धरणाचा १.९७ टीएमसी असा खडकवासला प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा ३१.२७ टीएमसी इतका आहे.

`खडकवासला’तील उपलब्ध साठा (टीएमसीमध्ये)

टेमघर — ०.२४ (६.४६ टक्के)

वरसगाव — ५.८२ (४५.३६ टक्के)

पानशेत — २.६० (२४.४० टक्के)

खडकवासला —१.१२ (५६.८२ टक्के)

उपलब्ध एकूण पाणीसाठा — ९.७८ (३१.२७ टक्के)

गेल्या वर्षीचा आजच्या तारखेचा साठा — ९.९१ (३४.०० टक्के)

दोन वर्षापुर्वींचा आजच्या तारखेचा साठा — ११.७६ (४०.३५ टक्के)