पुणे महापालिकेच्या आघाडीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दोन गट; चेंडू आत्ता ‘साहेबां’च्या कोर्टात!

0

आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची, की नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘कोअर कमिटी’च्या शनिवारी झालेल्या बैठकीत दोन गट पडले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना एका गटाने लक्ष्य करीत जोरदार टीकास्त्र सोडले. अखेरीस आघाडीचा चेंडू ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कोर्टात ढकलून वेळ मारून नेल्याची जोरदार चर्चा ‘राष्ट्रवादी’त रंगली आहे.

पुण्यातील ‘राष्ट्रवादी’ची बैठक पार पडली असून, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापू पठारे, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, अश्विनी कदम, ज्येष्ठ नेते जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, काका चव्हाण, श्रीकांत पाटील, रवींद्र माळवदकर, ॲड. भगवानराव साळुंखे, उदय महाले, पंडीत कांबळे, सुरेंद्र पठारे, डॉ. सुनील जगताप आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

एकीकडे परदेशातील लग्नसोहळ्यात पवार कुटुंबीय हेवेदावे विसरून ‘झिगांट’ गाण्यांवर एकत्र ठेका धरीत होते. त्याच काळात पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आघाडी करायची, की नाही यावरून एकमेकांवर शाब्दिक फैरी झाडीत होते. या बैठकीत आघाडी करण्यावरून जगताप यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

विकासकामांसाठी सत्तेत सहभाग हवा. सत्ता मिळवायची असेल, तर एकत्र लढण्याची आवश्यकता आहे. स्थानिक पातळीवरील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी; तसेच निवडून येण्यासाठी आघाडी करण्याची मागणी ज्यांना लढायचे आहे, त्यातील बहुतांश नेत्यांनी केली, तर निवडणूक झाल्यानंतर अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’ भाजपबरोबर जाणार नाही कशावरून, असा प्रतिवाद बैठकीत झाला. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्यास भाजपला रोखता येणार आहे; तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास जागावाटपात कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, याची काय शाश्वती, पक्षाच्या आजवरच्या भूमिकेला तिलांजली दिली असे होणार नाही का, असा भावनिक सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.

अधिक वाचा  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता! लोकसभेत १५ बैठका, ९२ तास काम, १० विधेयके ८ मंजूरचे कामकाज

….तो निर्णय मान्य प्रशांत जगताप

पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा महायुतीतील एका पक्षासमवेत आघाडी करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मोदीबागेत भेट घेतली. या भेटीत पुणे शहरात आपण महाविकास आघाडीसोबत लढणार असल्याचा आदेश शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिला आहे. या बैठकीनंतर पुणे शहरातील सर्व ज्येष्ठ नेत्यांची स्वतंत्र बैठक रास्ता पेठेतील शांताई हॉटेल येथे पार पडली. या बैठकीतही बहुतांश नेत्यांनी आपण महाविकास आघाडी म्हणून शहरात लढावे अशी भूमिका घेतली. या बैठकीची माहिती पवारसाहेब, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शिंदे यांना पाठवणार आहे. पक्षनेतृत्व जो निर्णय घेतील तो मान्य केला जाईल, हे सर्वानुमते बैठकीत ठरल्याचे जगताप म्हणाले; तसेच ‘पुढील दोन दिवसांत इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम व पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत कार्यक्रम जाहीर केला जाईल,’ असेही त्यांनी सांगीतले.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर