मनु भाकर-डी गुकेशसह एकूण चौघांना खेळरत्न, 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर, पाहा यादी

0

भारतीय क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. खेळरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतासाठी विविध क्रीडा प्रकारात 2024 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 मेडल मिळवून देणाऱ्या मनु भाकर यासह एकूण चौघांना यंदाचा खेळरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

चौघांना खेळरत्न

डी गुकेश, महिला नेमबाज मनु भाकर, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिकपटू प्रवीण कुमार या चौघांना खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याच्यासह एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलं आहे.

डी गुकेश

डी गुकेश 12 डिसेंबर 2024 रोजी महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट करत वर्ल्ड चॅम्पियन ठरला. डी गुकेश याने डिंग लिरेन याचा 7.5-6.5 अशा फरकाने पराभव केला होता. डी गुकेशने यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवला.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदकं

भारतीय महिला नेमबाजपटू मनु भाकर हीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला होता. मनुने भारताला एकाच स्पर्धेत 2 पदकं मिळवून दिली होती. मनुने सिंगल आणि मिक्स डबल या दोन्ही प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून दिलं होतं.

‘सरपंच’ हरमनप्रीत सिंह

हॉकी टीम इंडियाने कॅप्टन हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात ऑलिम्पिकमध्ये सलग दुसर्‍यांदा मेडल मिळवलं होतं. हरमनला या कामगिरीसाठी खेळरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

प्रवीण कुमार

पॅरा हाय जंपर प्रवीण कुमार याने पॅरालिम्पिकमध्ये टी 64 वर्गात सुवर्ण कामगिरी केली. गुडघ्यापासून खाली एक किंवा दोन्ही पाय नसलेल्या खेळाडूंचा समावेश या टी 64 वर्गात केला जातो. या श्रेणीतील खेळाडू धावण्यासााठी कृत्रिम पायाचा वापर करतात.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

पुरस्कारातून क्रिकेट ‘आऊट’

केंद्र सरकारकडून यंदाच्या पुरस्कारासाठी एकही क्रिकेटपटूची निवड करण्यात आलेली नाही. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप तर 2011 नंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघातील निवडक खेळाडूंना पुरस्कार जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र तसं काहीच झालेलं नसल्याने क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.