‘एकेकाळी पवारांनी बॉम्ब स्फोट आरोपी विमानाने आणले होते’; अमित शाहांच्या टीकेवर विखेपाटील आक्रमक

0
9

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार शरद पवार आहेत, असे त्यांनी म्हटले होते. तर सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे, असा पलटवार शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर केला. आता शरद पवार यांच्यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे.

एकेकाळी शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणले होते

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शरद पवार हे अमित शाह यांच्यावर वैफल्यातून टीका करत आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अशी टीका करणे योग्य नाही. एकेकाळी शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणले होते. मग हेच राजकारण करत बसायचं का? मोदी सरकारच्या काळात कलम ३७० हटवण्यात आले, यापूर्वी कधी असे झाले नाही, असा पलटवार त्यांनी शरद पवारांवर केला आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

विधानसभेला महायुतीचेच सरकार येईल

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांना राज्यभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे जुने मित्र आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. वंदनीय शिवसेनाप्रमुख यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, असे त्यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यात बरेच मुख्यमंत्री होऊ लागलेत. काँग्रेसचे वेगळे मुख्यमंत्री, उबाठाचे वेगळे, राष्ट्रवादीचे वेगळे असे बरेच मुख्यमंत्री आहेत. राज्याची जनता ठरवेल, राज्यात महायुतीचा सरकार येणार महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे. लोकसभेला वेगळी परिस्थिती होती. मात्र, विधानसभेला महायुतीचेच सरकार येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!