पुणे महापालिका ‘पॉवरफुल’ पदी हे नाव सस्पेंस संपला! २२ वर्ष एकाकडे होती जबाबदारी अखेर मुदतवाढ नाही

0

पुणे महापालिकेतील ‘पॉवरफुल’ पद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहर अभियंता पदावर पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना पदोन्नती देण्याचा निर्णय आज महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय पदोन्नती समितीने घेतला आहे. त्यास शहर सुधारणा समितीच्या बैठकीतही मान्यता देण्यात आली. विद्यमान शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे सेवानिवृत्त होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख आणि शहर अभियंता ही चार पदे शासनाच्या मान्यतेची (स्टॅट्युटरी पोस्ट) आहेत. शहर अभियंता यांच्या अंतर्गत बांधकाम विभागात येतोच पण त्याशिवाय अभियांत्रिकीशी संबंध असलेल्या सर्व विभागांवर त्यांचे नियंत्रण असते.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे गेल्या २२ वर्षापासून या पदावर कार्यरत असून, ते ३१ जानेवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. वाघमारे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार ही चर्चा पुणे महापालिकेत गेल्या अनेक महिन्यापासून चर्चिली जात आहे. त्याच प्रमाणे हे पद महत्त्वाचे, प्रतिष्ठेचे असल्याने या पदासाठी राज्य शासनातील काही अधिकारीही फिल्डींग लावून आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून शासनातील अभियंत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. पण पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये काही झाले तरी या पदावर महापालिकेतील अधिकाऱ्याचीच नियुक्ती झाली पाहिजे. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी नको असा मतप्रवाह आहे.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

त्यामुळे या पदावर कोणाची निवड होणार याची चर्चा रंगलेली होती. आज दुपारी महापालिकेत विभागीय पदोन्नती समितीची बैठक पार पडली. शहर अभियंता पदासाठी मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आणि पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप हे दोघे पात्र होते. यामध्ये पावसकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर हा प्रस्ताव शहर सुधारणा समितीमध्ये ठेवण्यात आला होता, त्यासही मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान मुख्य सभेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, शहरातील महत्त्वाचे प्रकल्प अन्य कामासाठी म्हणून वाघमारे यांना दोन वर्षाची मुदतवाढ शासनाकडून दिली जाऊ शकते अशी चर्चा होती, पण तसा कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही व वाघमारे यांनीही तशी मागणी केलेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?