नेत्यांची प्रसारमाध्यमांत महायुतीची हाक आणि मेळाव्यात ‘एकला चलो’चा नारा भूमिका स्पष्ट नसल्याने इच्छुकांची मोठी अडचण?

0

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार का, याबाबत उलटसूलट विधाने येत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना महायुतीची हाक द्यायची आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ‘एकला चलो’चा नारा द्यायचा, या दुटप्पी भूमिकेमुळे कार्यकर्त्यांनाही ‘कोणता झेंडा घेऊ हाती,’ असा प्रश्न पडला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्याचवेळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात या नेत्यांकडून स्वतंत्र लढणार असल्याचा कानमंत्र आपल्या पदाधिकाऱ्यांना, माजी नगरसेवकांना दिला आहे. अजित पवार यांनी माजी नगरसेवकांच्या अनौपचारिक बैठकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढेल, अशी भूमिका घेतली होती. गत महापालिकांतील निवडून आलेल्या नगरसेवकांची गणिते बघितली तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुती म्हणून लढणे भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे चित्र दिसते.

अधिक वाचा  डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठा पुरावा मोबाईलपेक्षाही एक महत्वाची गोष्ट पोलिसांच्या हाती; मोठे खुलासे होण्याची शक्यता

भाजपचे २२ प्रभागांत वर्चस्व

पुणे महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता होती. महापालिकेतील १६२ पैकी ९७ नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दोनने वाढ होत भाजपच्या महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ही ९९ झाली. भाजपचे ४१ प्रभागांपैकी १५ प्रभागांमध्ये चारही सदस्य निवडून आले होते. तर, सात प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन असे २१ नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या विजयाचे गणित २२ प्रभागांमध्ये दडलेले होते. या २२ प्रभागांमधूनच ८१ नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे ४१ प्रभागांपैकी ३४ प्रभागांमध्ये किमान एकतरी नगरसेवक निवडून आला होता. तर, उर्वरित सात प्रभागांमध्ये विरोधकांची ताकद दिसली होती. महापालिकेची नव्याने प्रारूप प्रभाग रचना करताना विरोधी नगरसेवकांचे प्राबल्य असलेल्या सात प्रभागांमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

‘राष्ट्रवादी’त फूट

राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या निवडणुकीत एकसंध असताना ४० नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादीचे खराडी-चंदननगर, मुंढवा-मगरपट्टा तसेच वारजे माळवाडी या तीन प्रभागांमध्ये प्रत्येकी चार असे १२ नगरसेवक निवडून आले होते. तर, आंबेगाव-दत्तनगर-कात्रज गावठाण, धनकवडी आंबेगाव पठार आणि कोंढवा खुर्द-मिठानगर या प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून आले होते. रामटेकडी-सय्यदनगर या तीन सदस्यीय प्रभागांमध्ये एक राष्ट्रवादी आणि दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. हे अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादीबरोबर राहिले होते.