फडणवीसांचं रवींद्र धंगेकर अन् मोहोळ आरोप-प्रत्यारोपाच्या वादावर मोठं भाष्य; म्हणाले, “विनाकारण…”

0

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरण मागील काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रवींद्र धंगेकर हे दररोज मंत्री मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे पुण्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, या वादावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव विनाकारण त्यामध्ये घेण्याचा काही जण प्रयत्न करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणामध्ये जैन समाजाच्या मनाप्रमाणेच योग्य तो निर्णय होईल असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, यावर तुमची भूमिका काय? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काहीही भूमिका घेण्याचं कारण नाही. अनेक लोक निवडणुकीजवळ आल्या की प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. हा मुद्दा एक बिल्डर्स आणि आमच्या जैन बांधवांमधील आहे. त्यात आम्ही जी भूमिका घ्यायची? ती आम्ही घेतलेली आहे”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

“आम्ही जैन समाजाच्या भावना समजून घेत या प्रकरणात जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होईल असा प्रयत्न आम्ही करत आहोत. मात्र, विनाकारण मुरलीधर मोहोळ यांचं नाव त्यामध्ये घेण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. मात्र, पुण्याची जनता सुज्ञ असून ते सर्व पाहत आहेत, पुण्याच्या जनतेला सर्व समजत आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

अधिक वाचा  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार