औंधमध्ये वीज वितरण कंपनीच्या कक्षात दोन तरुणांचा शॉक लागून मृत्यू?

0

ब्रेमेन चौकाजवळील एमएसईडीसीएलच्या पॉवर रूममध्ये आढळले होते बेशुद्ध अवस्थेत

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या (MSEDCL) पॉवर रूममध्ये दोन तरुणांचा संशयास्पदरीत्या शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. औंध येथील ब्रेमेन चौकाजवळ असलेल्या पॉवर कक्षात ही घटना घडली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेत मृत्यू झालेल्यांची ओळख विनोद चिंतामण क्षीरसागर (वय २९, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) आणि सौरभ विजय निखळजे (वय २७, रा. कोथरूड) अशी झाली आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, विनोद हा रिक्षा चालक होता, तर सौरभ एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास विनोद रिक्षा घेऊन घरातून निघाला, पण घरी परतला नाही. रात्री साडेनऊच्या सुमारास त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्याची आई लीलाताई क्षीरसागर यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

एमएसईडीसीएलचे पॉवर कक्ष हे ब्रेमेन चौकातील सार्वजनिक शौचालयाशेजारी आहे. सोमवारी सकाळी स्थानिक रहिवाशांना पॉवर कॅबिनमध्ये दोन व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत दिसल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एमएसईडीसीएलच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीज पुरवठा खंडित केला आणि दोघांना उपचारासाठी औंध रुग्णालयात हलवले. मात्र त्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

दोघांचाही मृत्यू नक्की कशामुळे झाला याबाबत स्पष्टता नसली, तरी वीज प्रवाह लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांमध्ये काय संबंध होता आणि त्यांनी वीज कंपनीच्या बंदिस्त क्षेत्रात प्रवेश का केला, याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास चतु:श्रृंगी पोलीस करत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी ही आकस्मिक मृत्यूची नोंद असून सर्व शक्यता तपासल्या जात असल्याची माहिती दिली.