“पूर्ण दक्षिण भारत मोगलांमुळे पीडित होता. उत्तर मुगलांच्या आधीन होता. त्यावेळी 12 वर्षाच्या मुलाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा अकल्पनीय पराक्रम होता. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचीच केवळ स्थापना केली नाही. तर राज्यभरातील तरुणांच्या मनात स्वराज्याची कल्पना रुजवली. त्यांच्यानंतर संभाजी महाराज, ताराबाई, धनाजी संताजी यांनी शिवाजी महाराजांची परंपरा पुढे नेली” असं अमित शाह म्हणाले. “स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. पण जेव्हा शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून आले. तेव्हा मराठी साम्राज्याचे दोन तुकडे झालेले. तेव्हा बालाजी विश्वनाथ त्यानंतर श्रीमंत बाजीरावांनी पेशवा बनून शिवाजी महाराजांची मशाल पुढे नेली. बाजीरावांच्या मृत्यूनंतर 10 वर्षातच तंजावूर पासून कटकपर्यंत विराट हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. ही स्वातंत्र्याची लढाई शिवाजी महाराजांनी सुरू केली. पेशव्यांनी 100 वर्ष चालवली. ती लढली नसती तर आज भारताचं मूळ स्वरुप राहिलं नसतं” असं अमित शाह म्हणाले.
“आपली त्वरा आणि रणनीती तसेच वीर साथीदारांच्या सोबत बाजीराव पेशव्यांनी अनेक हरलेली युद्ध जिंकली. पालखेडचा विजय काळजीपूर्वक वाचला तर निजामाच्या विरोधातील हा विजय अकल्पनीय होता. अनेक युद्ध कौशल्याचे अभ्यासू देश आणि विदेशातील सेनानींनी त्यांच्या युद्ध कौशल्यावर बरंच सांगितलं आहे. पण बुंदेलखंड, गुजरात, तंजावूर, मध्यप्रदेशापर्यंत या सर्व स्थानापासून स्वराज्याची ज्योत पेटवल्यानंतर धारमध्ये पवार, बडोद्यात गायकवाड अनेक ठिकाणी चिमणाजींचं सहकार्य घेऊन प्रशासन स्थापन केलं. दीर्घकाळ स्वातंत्र्याची ज्योत पेटत राहील असं काम त्यांनी केलं” असं अमित शाह म्हणाले.
“बाजीरावांचा अश्वारुढ पुतळा तयार केला त्याबद्दल आभार. कोणत्याही व्यक्तीचा जन्म घोड्यासोबत होत नाही. पण बाजीरावांचा झाला. 20 वर्षाच्या कालखंडात त्यांना घोड्यावरून उतरलेलं कोणी पाहिलं नाही. त्यांनी शनिवारवाडा बांधला. त्यांनी चांगलं प्रशासन चालवलं. त्यांनी अनेक सुधारणेची कामं केली. मी इसवी सन 1500 च्यानंतरची युद्ध वाचली. पण मी कुठे अशाच सैन्याचं वर्णन ऐकलं नाही. ज्यात एक शिपाई आणि तीन घोड्यांची व्यवस्था होती. प्रत्येक शिपायाला तीन घोडे होते” असं अमित शाह म्हणाले.
अमर इतिहास त्यांनी लिहिला
“घोडा थकल्यावर दुसऱ्या घोड्यावर बसून शिपाई जायचे आणि विजेसारखे शत्रूवर कोसळायचे. 41 युद्धात कोणी कसे यश मिळवू शकतो हे आश्चर्य आहे. काही लोक त्यांना ईश्वरदत्त सेनापती म्हणतात, काही लोक अजिंक्य योद्धा म्हणतात तर काही लोक शिवष्योत्तम सैनिक म्हणतात. बाजीराव कधीच स्वतसाठी लढले नाही. ते देश आणि स्वराज्यासाठी लढले. कारण ते पंतप्रधान होते. इंग्रजांनी इतिहास विकृत केला. एवढा पराक्रम आणि शक्ती असूनही बाजीराव आजीवन पेशवा होते. स्वराज्यासाठीच ते लढले. 40 वर्षाच्या जीवनात त्यांनी अमर इतिहास लिहिला. कोणीच अनेक शतकं लिहू शकणार नाही असा अमर इतिहास त्यांनी लिहिला” असं अमित शाह म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर याचं उदाहरण आहे
“शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत तयार करण्याची जबाबदारी 140 कोटी भारतीयांची आहे. स्वराज्यासाठी संघर्ष करण्याची गरज होती तेव्हा संघर्ष केला. स्वराज्य टिकवण्यासाठी गरज पडली तर आम्ही संघर्ष करू. ऑपरेशन सिंदूर याचं उदाहरण आहे. पण स्वराज्यासोबत महान भारताची संकल्पानाही शिवाजी महाराजांची संकल्पना आहे” असं अमित शाह म्हणाले.
“संपूर्ण जगात आपणच नंबर वन आहोत असा भारत तयार करणं आपलं लक्ष्य असलं पाहिजे. त्यासाठी पुरुषार्थ, समर्पण, बलिदानाची प्रेरणा घेण्यासाठी उत्तम व्यक्तीमत्त्व कोणी असेल तर श्रीमंत बाजीराव पेशवा हेच आहेत” असं अमित शाह यांनी सांगितलं.
मोदींनी विकास आणि विरासत हे सूत्र दिलं आहे
“मी विनयजींनाही सांगतो, तुम्ही माईकमध्ये सांगितलं, भारताच्या सर्व भाषेत या इतिहासाला भावानुवाद करून भारताच्या सर्व भाषेतील तरुणांना उपलब्ध करून दिला पाहिजे. तुम्ही सल्ला दिला आहे. सल्ले अनेक देतात. मी तुमची मदत करेलच. पण तुम्हीच सुरुवात करा. हे काम लवकर होईल. मोदींनी विकास आणि विरासत हे सूत्र दिलं आहे. आपल्या हजारो वर्षाच्या संस्कृतीत अनेक व्यक्तीत्व झाले आहेत, जे आपल्याला प्रेरणा देत आहेत. त्यांचा इतिहास आजच्या युवांना देण्याची गरज आहे” असं अमित शाह म्हणाले.