पानशेत खून प्रकरण: तरुणाच्या छातीत दगड घालून हत्या; परभणीच्या ५ आरोपींना अटक

0

फिरायला आलेल्या काही तरुणांनी एका स्थानिक युवकाची दगडाने छातीवर मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना पानशेत येथे घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलिसांनी जलद कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे.

मृत युवकाचे नाव रोहिदास काळूराम काटकर (वय २४, रा. कडवे, ता. वेल्हे) असे आहे. याप्रकरणी अविवास कालूराम काटकर (वय २३) यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी हे सर्व परभणी जिल्ह्याचे मूळ रहिवासी असून सध्या पुण्यातील नर्‍हे परिसरात राहतात. त्यांची नावे आकाश सुभाष भिसे (वय २१, रा. नऱ्हे), भगवत मुंजाजी असुरी (वय २०, रा. नऱ्हे), ऋतेश उत्तम जोगदंड (वय २१), उमेश ऊर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय २१), पांडुरंग भानुदास सोनवणे (वय १९) अशी आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

१५ जून रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, आरोपींचा गट दुचाकींवरून पानशेत धरण परिसरात फिरायला गेला होता. परतीच्या वाटेवर ते एका हॉटेलजवळ सिगारेटसाठी थांबले. तेथे स्थानिक तरुण रोहिदास काटकर याच्याशी त्यांचा वाद झाला, वाद इतका वाढला की आरोपींनी रोहिदासच्या छातीत दगड घालून ठार मारले. घटनेनंतर सर्व आरोपी दुचाकींवरून पुण्याकडे फरार झाले.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दोन काळ्या रंगाच्या दुचाकींवरून घटनास्थळावरून पळाले. CCTV फुटेजमध्ये दोन्ही गाड्या नर्‍हेच्या दिशेने जाताना दिसल्या. एका गाडीचा नंबर अंशतः स्पष्ट दिसल्याने पोलीसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान नर्‍हे येथील वाल्हेकर चौकात एका दुकानाबाहेर दुचाकी सापडली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

गाडीच्या मालकाची चौकशी केली असता, त्याने ती गाडी आकाश भिसे याला दिल्याचे सांगितले. भिसेला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व आपल्या सहका-यांची नावे उघड केली. त्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली.

या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांची साथ होती. त्याचबरोबर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश शिलिमकर, वेल्हा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन खमगळ व राहुल गावडे, पोलीस अधिकारी सचिन गाडगे, अजित भुजबळ, मंगेश भगत, हनुमंत पासलकर, अतुल डेरे, अमोल शेडगे, रामदास बाबर, राहुल घुबे, प्रसन्ना गाडगे, उपनिरीक्षक अमित देशमुख (मुख्य तपास अधिकारी), सहाय्यक अधिकारी: ज्ञानदीप धिवर, पंकज मोगे, आकाश पाटील, राजेंद्र आवडे, अजय गार्डी, सोमनाथ जाधव, युवराज सोमवंशी यांनी ही कामगिरी केली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार