पुणे शहराच्या वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगर येथे मध्यरात्री एका हृदयद्रावक घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पत्र्याच्या बांधकाम असलेल्या घरांमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे घडली. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.






सिलिंडरचा मोठा स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी भागातील गोकुळ नगरमध्ये असलेल्या काही पत्र्याच्या घरांना मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे कारण तात्काळ स्पष्ट झाले नसले तरी, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले.
अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल
आगीच्या ज्वाला आणि धुरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मध्यरात्रीची वेळ असल्याने अनेकजण गाढ झोपेत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीच्या भीषणतेमुळे आणि पत्र्याचे बांधकाम असल्यामुळे आग वेगाने पसरली. या दुर्घटनेत दोन व्यक्ती आगीत होरपळून जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
परिसरात शोककळा
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी असून, आगीच्या कारणांचा आणि मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
नाना पेठेत लाकडी घराला आग
दरम्यान, काल शहराच्या मधोमध एका मोठ्या घरात आग लागली. ही आग नाना पेठेत राम मंदिराच्या बाजूला असलेल्या एका जुन्या घरात लागली. घर लाकडी असल्यामुळे आग खूप वेगाने पसरली आणि मोठी झाली. काल रामनवमी असल्यामुळे मंदिरात खूप लोक आले होते. अग्निशामक विभागाने लगेच आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न केले.











