भोरला राजवाड्यात संस्थानच्या ३०५ वर्षांच्या परंपरेनुसार पारंपारिक पध्दतीने रामजन्मोत्सव साजरा

0
2

भोर येथील राजवाड्यात संस्थानच्या ३०५ वर्षांच्या परंपरेनुसार रविवारी (ता.६) दुपारी रामजन्माचा शाही सोहळा पार पडला. भोरचे राजे राजेशराजे पंतसचिव यांनी रविवारी दुपारी बारा वाजता पाळण्याची दोरी ओढून जन्मोत्सवाच्या मुख्य सोहळ्यास सुरवात केली. श्रीरामाचा पाळणा झाल्यानंतर उपस्थितांनी फुलांची उधळण करीत प्रभूरामचंद्राचा जयघोष केला. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता सुवर्णकार कोळसकर अॅन्ड सन्स यांच्या दुकानातून श्रीरामांच्या सुवर्णमूर्तीची (टाक ची) विधीव्रत पूजा करून मूर्ती पालखीतून राजवाड्यात आणली. यावेळी पंतसचिवांचे वंशज आणि संस्थान काळापासून पालखीचा मान असलेल्या घराण्यांचे वंशज उपस्थित होते.

पंतसचिव घराण्यातील आबाराजे पंतसचिवांचे चिरंजीव राजेशराजे, स्वातीराजे, पार्थराजे, ईशाराजे व निमिशाराजे यांच्यासमवेत प्रांताधिकारी डॉ विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, प्रमोद फडणीस, प्रमोद गुजर, राहूल गांडेकर, प्रणव गांडेकर आदींसह राजदरबाराचे मानकरी उपस्थित होते. यावेळी रामजन्मोत्सवात पंतसचीवांचा मान असलेल्या घराण्यातील मान्यवर, माजी नगरसेवक यशवंत डाळ, जगदीश किरवे, सचिन मांडके, राजेश वाझे, आदर्श सागळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी ३ अधिकारी ६० पोलिस कर्मचारी आणि पोलिस पाटलांच्या मदतीने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

रामजन्म सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता.४) सप्तमीला सायंकाळी स्वातीराजे व योगेशराजे यांनी भोरेश्वर व वडिल घराण्यातील श्रीपाद गांडेकर यांच्या देव्हा-यातील रेणुकादेवी व लक्ष्मीनारायणाला अक्षत दिले. शनिवारी (ता.५) राजवाड्यात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करून पुण्याहवाचन करण्यात आले. रामजन्म सोहळ्यापूर्वी राजवाड्यात सकाळी राजाभाऊ दुसंगे, मधूकर पैठणकर, प्रिती शहा, सुधीर शिरवले, शिवाजी तामकर यांनी गीतरामायनाची गीते सादर केली. रामजन्म सोहळ्यानंतर भोरवासीयांना पंतसचिवांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. दरम्यान शहरातील सर्वच रस्त्यांवर शोभेच्या वस्तूंचे, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक आणि खाऊच्या स्टॉल्समधून खरेदी करण्यासाठी हजारो महिलांनी गर्दी केली. सम्राट चौकाजवळ उभारण्यात आलेल्या मनोरंजन नगरीमध्ये बालगोपाळांनी खेळण्याचा आनंद लुटला.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

रामनवमीचा महोत्सवाची परंपरा ५०० वर्षे सुरु राहणार

भोर संस्थानात १७२० सालापासून श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. हा उत्सव केवळ पंचसचिव घरण्याचा नसून प्रदेशातील सर्व नागरिकांचा आहे. भोर शहर आणि तालुक्यातील रामभक्तांच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे श्रीरामजन्मोत्सव सोहळ्याचे पावित्र्य व परंपरा टिकून आहे. आजपर्यंतची ३०० वर्षांची परंपरा पुढील २०० वर्षे सुरु राहून ५०० वर्षांची अखंडीत परंपरा सिध्द होईल असा मला विश्वास आहे.

राजेशराजे पंतसचिव, भोर संस्थान