भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर गोळीबार अथवा हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानने काल शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. कालही सीमेवर सीजफायर झालं. त्यामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. आज रात्री जर पाकिस्तानने सीजफायरचं उल्लंघन केलं तर आम्ही पाकिस्तानला तगडं उत्तर देणार आहोत, असा इशाराच भारतीय सैन्याने दिला आहे. भारतीय सैन्याची आज अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद झाली. यावेळी पाकिस्तानचं कसं कंबरडं मोडलं याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानच्या कुरापतींचीही माहिती देण्यात आली आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानला कसा धडा शिकवला याची माहिती देतानाच पाकिस्तानचं किती मोठं नुकसान झालंय याची माहितीही दिली आहे. नाव सांगणार नाही, पण आम्ही पाकिस्तानचे हायटेक फायटर पाडले आहेत. तसेच आपल्या एअरबेसवर पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पाकिस्तानचा हल्ला हा नाकाम केला आहे, असं भारतीय सैन्याने म्हटलं आहे.
काही तासातच कराराचं उल्लंघन
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत मोठी माहिती दिली. काल दुपारी पाकिस्तानच्या डीजीएमओनी दुपारी 3.35 वाजता आमच्याशी संपर्क साधला. त्यामुळे 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता दोन्ही देशांनी सीजफायर आणि एअर इंट्रजनला पूर्णविराम दिला. पाकिस्तानच्या डीजीएमओने दिलेल्या प्रस्तावानंतरच हा निर्णय घेण्यात आला. तसेच येत्या 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओशी पुन्हा चर्चा होणार आहे. त्यात करार अधिक मजबूत आणि दीर्घकालिक करण्यात येणार आहे. परंतु, नैराश्याने ग्रासलेल्या पाकिस्तानी सैन्याने काही तासातच कराराचं उल्लंघन केलं आहे. क्रॉस बॉर्डर फायरिंग आणि ड्रोनचं आक्रमण करून ते आमच्या सहमतीचं पालन करणार नसल्याचं दिसून आलं आहे, असं राजीव घई म्हणाले.
पाकिस्तानला सज्जड ताकीद
त्यांनी केलेल्या उल्लंघनाचा आम्ही त्याच शब्दात उत्तर दिलं आहे. तसेच पाकिस्तानने काय उल्लंघन केलं याची माहिती आम्ही पाकिस्तानच्या डीजीएमओला हॉटलाईनवरून दिली आहे. तसेच पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर कडक शब्दात उत्तर दिलं जाईल, असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आला आहे, अशी माहिती राजीव यांनी दिली. तसेच पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचं उल्लंघन केल्यास त्यांना तात्काळ जशास तसे उत्तर देण्याचे आदेश आमच्या आर्मी प्रमुखांनी आम्हाला दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
हल्ले परतवून लावले
हवाई दलाचे डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनीही या ऑपरेशन्सची माहिती दिली. 8 मे रोजी भारतीय हवाई दलाने लाहोर येथील पाकिस्तानी देखरेख रडार साईट्सला निशाणा बनवलं. आम्ही ठरवून पाकिस्तानला उत्तर दिलं. त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. आम्ही हे सर्व ड्रोन हल्ले उधळून लावले. पाकिस्तानी ड्रोन आणि मानवरहीत प्रणालीने भारतीय एअरबेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टिम आधीच तयार होत्या. त्यामुळे आम्ही पाकचे हल्ले परतवून लावले, असं अवधेश कुमार भारती म्हणाले.
जिथे नुकसान होईल तिथेच…
पाकिस्तानला जिथे अधिक जखम होईल, अधिक नुकसान होईल, अशाच ठिकाणी आम्ही हल्ले चढवले. आम्ही वेगवान आणि संतुलित उत्तर दिलं. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाचे अड्डे, कमांड सेंटर्स, सैन्य ढाचा आणि एअर डिफेन्स सिस्टिमला निशाणा बनवलं. भारतीय हल्ल्यात पाकिस्तानचे चकलाला, रफीक आणि रहीम यार खान आदी महत्त्वाच्या एअरबेसचा समावेश होता. त्यानंतर सरगोधा, भुलारी आणि जैकबाबाद आदी प्रमुख सैन्य ठिकाण्यांवरही आम्ही हल्ले चढवले. आमच्याकडे या सर्व सैन्य ठिकाणांना निशाणा साधण्याची संपूर्ण क्षमता आहे. त्यापुढेही आम्ही जाऊ शकतो, असंही भारती यांनी सांगितलं.