राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना सत्ताधारी पक्षात असूनही धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यांनी आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. तसेच प्रशासकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचा या दोन्ही गोष्टींना विरोध होता. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडीलच सहकार मंत्रालयाने रामराजेंना धक्का देत हे दोन्ही निर्णय घेतले आहेत.
पण सत्तेसोबत असतानाही रामराजे नाईक निंबाळकर यांना बसलेला हा पहिलाच धक्का नाही. यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण, पुणे आणि मुंबईतील घरांवर एकाचवेळी प्राप्तिकर विभागाची धाड पडली होती. त्यापाठोपाठ काही दिवसांपूर्वी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीला स्थगिती देऊन प्रशासक नेमण्याची मागणी सरकारकडे केली होती. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्थगिती न देता निवडणूक पुढे ढकलली होती. हाही रामराजेंसाठी एक प्रकारे धक्काच होता.
प्रशासक नियुक्त झाल्यास काय परिस्थिती होते हे आपण फलटण नगरपालिकेत पाहत आहोत. प्रशासक त्यांच्यामागे नंदीबैलासारखा फिरून त्यांनी सांगितलेली कायदेशीर आणि बेकायदेशीर कामे करत असतो. हीच परिस्थिती त्यांना श्रीराम सहकारी साखर कारखान्यात अप्रत्यक्ष चुकीचे निर्णय घेऊन करायची आहे, असे म्हणत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासक नियुक्तीला विरोध दर्शविला होता. पण आता निवडणुकीला स्थगिती तर दिलीच आहे शिवाय प्रशासकही नियुक्त करण्यात आला आहे.
या सगळ्या घटनांमध्ये अजित पवार मात्र चार हात लांबच आहेत. ते निंबाळकर यांना कोणतीच दयामाया दाखवताना दिसत नाहीत. यामागे त्यांच्या मनात विधानसभा निवडणुकीत रामराजेंनी ऐनवेळी दिलेल्या धक्क्याविषयीचा राग असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेला दीपक चव्हाण यांची उमेदवारी फलटणमधून जाहीर झाली होती. पण संजीवराजे नाईक निंबाळकरांसह दीपक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार झाले.
मग अजितदादांनी ऐनवेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सचिन कांबळे पाटील यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली. त्यांच्या विजयासाठी फलटणमध्ये सभा घेतली. तसंच “तुम्ही फक्त दीपक चव्हाणांच्या प्रचारात जावाच, तुम्ही आमदार कसे राहता हेच बघतो”, असा इशाराच त्यांनी रामराजेंना दिला होता. “श्रीमंत बंद दाराआड बैठका घेतात. तुमच्यात धमक असेल तर आमदारकीला लाथ मारा आणि तिकडे जावा. आमदारकी पण टिकवायची आणि असा प्रचार करायचा हे योग्य नाही”, असं म्हणत रामराजेंच्या अंतर्गत बैठकांवर भाष्य केलं होतं.
पण निकालानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्याशी पॅचअप केल्याच्या चर्चा होत्या. ते अजित पवार यांच्या बैठकीतही उपस्थित राहिले होते. वरिष्ठ नेत्यांचा मान देत त्यांना अजितदादांनी पहिल्या रांगेत बसवले होते. शिवाय संजीवराजे नाईक निंबाळकर पुन्हा अजित पवार यांच्या पक्षात येऊ शकतात अशा चर्चांना सुरुवात झाली होती. पण मागील काही काळात रामराजे यांना बसलेल्या धक्क्यांवर अद्यापही अजित पवार यांच्या मनात राग कायम आहे, असेच म्हणायला हवे.