विधिमंडळात 20 मार्च रोजी दिशा सालियन मृत्यू प्रकरण चांगलेच गाजले. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेनंतर आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव दिशाच्या मृत्यू प्रकरणाशी जोडले जात आहे.त्याचेच पडसाद सभागृहात उमटले. आमदार तथा माजी मंत्री अनिल परब यांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा उल्लेख केल्यानंतर परब आणि आमदार चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. आता याच टीकेला चित्रा वाघ यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.






चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना काय उत्तर दिलं?
चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारे यांचे कुठेही नाव घेतलेले नाही. मात्र अंधारे यांनी केलेल्या टीकेलाच वाघ यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर ट्वीट करत आपलं मत मांडलं आहे. “फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागत स्त्री काय आहे. फार हलक्यात घेतात महिलांना. आम्ही काहीही बोलू शकतो ही त्यांची मानसिकता आज ठेचली आणि आमच्या नादी लागलात तर रोजचं ठेचणार,” असं चित्रा वाघ म्हणाल्या.










