हायव्होल्टेज ड्रामा संपला, उदय सामंत यांनी दिली माहिती , फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर थेट राज्यपालांकडे रवाना

0
26

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल म्हणजे महाविकास आघाडीला धक्का तर महायुतीला सुखद धक्का होता. त्यानिकालानंतर गेल्या बारा दिवसांपासून राज्यात राजकीय अनिश्चितता होती. राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? हे तब्बल १२ दिवसांनी जाहीर झाले. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. परंतु त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या सुरु झाल्या. दिल्लीवरुन अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीपासून शपथविधी सोहळ्याच्या दिवसापर्यंत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नसल्याचे म्हटले जात होते. परंतु शिवसेना आमदारांनी केलेल्या मनधरणीनंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले. शिवसेना नेते उदय सामंत यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले. आपण पत्र घेऊन राजभवनात जात असल्याचे त्यांनी म्हटले.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

उदय सामंत अन् फडणवीस यांची भेट
शिवसेना नेते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आमदारांच्या भावना त्यांना सांगितल्या. तसेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नसतील तर शिवसेनेचा कोणताही मंत्री शपथ घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अखेर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास तयार झाले. त्यानंतर उदय सामंत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचले. त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

राज्यपालांकडे पत्र घेऊन रवाना
एकनाथ शिंदे यांचा निरोप देवेंद्र फडणवीस यांना उदय सामंत यांनी दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे पत्र तयार झाले. हे पत्र घेऊन उदय सामंत राजभवनाकडे निघाले. माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र देण्यासाठी मी राज्यपालांकडे जात आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

उदय सामंत यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना सुरु केल्या होत्या. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये असणे गरजेचे आहे. ते पक्ष प्रमुख म्हणून काम करणार होते. परंतु आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेण्यास तयार झाले. दरम्यान, गृहमंत्रीपदाबाबत अजूनही चर्चा सुरु आहे. गृहमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे आग्रही आहेत. आता त्यांना भाजप हे पद देणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.