विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजनेचा निधी १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र, अर्थसंकल्पात सरकारने यासंदर्भातील कोणतीही घोषणा केलेली नाहीये. त्यामुळे विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे.






रामदास कदम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी लाडकी बहीण योजने बाबतही भाष्य केलं. एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले रामदास कदम?q
”लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिले, तर ते ३० हजार कोटींपेक्षा जास्त आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते. एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येतील”, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना बोलताना, बजेट डोळ्यासमोर ठेऊन सगळ्या योजना सुरू कराव्या लागतात. अंथरुन पाहूनच पाय पसरावे लागतात, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. विरोधक यावर कशाप्रकारे व्यक्त होतात, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत कोट्यवधी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच योजनेतील निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेणाऱ्या पाच लाख बहिणींना सरकारने अपात्रही ठरवले आहेत. महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. त्यामुळे आणखी काही महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.











