मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या विषयी मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून जवळपास 90 दिवासांपासून कृष्णा आंधळे फरार आहे. कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा लागला असल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णा आंधळेचा सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. तर, कृष्णा आंधळे हा फरार आहे. कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्याकांडातील नववा आरोपी आहे. सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर कृष्णाने आरोपींच्या मोकारपंती ग्रुपवर व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल केल्याचे समोर आले. आता कृष्णा आंधळेंचा ठावठिकाणा लागला असल्याचे समोर आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे नाशिक मध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा काही लोकांनी दावा केला आहे. याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून तपास सुरू केला आहे.
बाईकस्वारासोबत आला कृष्णा आंधळे…
एका मोटरसायकलवर कृष्ण आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. कृष्णा आंधळेने कपाळी टिळा लावला होता. स्थानिकाने हटकल्यानंतर तो दुचाकीवरून पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.