धंगेकर अजित पवारांबद्दल बोलले अन् महायुतीत भडका?; दिपक मानकरांनी इशारा देत अनेक गोष्टींचा खुलासा सगळंच काढलं

0
1

पुणे : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. धंगेकर यांनी शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केल्यानंतर महायुतीत वादाचा भडका उडाला आहे. आधी चंद्रकांत पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा रवींद्र धंगेकर यांना फैलावर घेतलं आहे.

‘अजित पवार ज्या दिवशी डोक्यावर पाय देतील त्यावेळी कळेल. दादांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. नाही तर एक दिवस तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही’, असं म्हणतं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी रवींद्र धंगेकर यांना इशारा दिला आहे.

‘आपल्याला वाटत होतं का? अजित पवार आणि भाजप एकत्रित येतील. मात्र, राजकारणात काहीही होऊ शकतं. अजितदादांना तर त्यांनी जेलच्या दारात नेऊन बसवलं होतं. अजित पवारांविरोधात ट्रकभर कागदपत्रं आहेत, असेही सांगितले जात होते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांना सोबत घेऊन अर्थ खातंही देण्यात आलं आहे, त्यामुळे राजकारणात असं काही नसतं’, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांच्यावर केली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने धंगेकर यांच्या टिकेचा समाचार घेतला आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

‘रविंद्र धंगेकर यांनी स्वतः चार दरवाजे फिरून शिंदे गटात प्रवेश केला. अजितदादांबद्दल बोलण्याची त्यांची लायकी आहे का? आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळी अजितदादांच्या पाया पडून विनंती करून राष्ट्रवादीची मदत घेऊन गद्दार निवडून आल, नंतर सरड्यासारखे रंग बदलायला लागले. पुण्यातील पब संदर्भात आंदोलन करायची, हप्ते वसूल करून नंतर आंदोलन स्थगित करायची. कॉर्पोरेशनच्या कामांमध्ये बिल्डर लोकांची कामं अडवून खंडणी वसूल करायची. लक्ष्मीरोडच्या सराफांकडून घर दुरुस्तीच्या नावाने कॉर्पोरेशनकडून बांधकामाला परवानगी घेवून सगळी सोन्या मारुती चौकातील बांधकामे बेकायदेशीर करून पैसे वसूल करायचे, वक्फ बोर्डाची मुसलमान समाजाची गणेश पेठेतील जमीन गिळंकृत केली’, असा घणाघात दिपक मानकर यांनी धंगेकर यांच्यावर केला आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

‘लाचलुचपत खात्यात त्यांच्या विरोधात १५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली याची चौकशी सुरु आहे. क्राईम ब्रांच युनिट १ ला खंडणीचा गुन्हा प्रलंबित आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा या पडीक आमदारास दादांनी केलेल्या उपकाराची जाणीव नाही. वाटेल ते स्टेटमेंट करतात. दादांनी त्यांना दाखवले आहे. ज्या दिवशी बडगा दाखवतील त्यावेळी या बांडगुळाला त्याची लायकी समजेल. शिंदे गटात जाऊन स्वतःला भविष्यात पोलिसांकडून होणारा त्रास कमी होणार नाही. गृह खाते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. याची जाणीव ठेवा. केलेली पापे इथेच फेडायची आहेत,’ असं देखील मानकर म्हणाले आहेत.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

‘मुस्लीम समाजाला वापरून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. शिक्षण मंडळाच्या बालवाडी शिक्षिका, सेविका यांना कायम करण्यासाठी करोडो रुपये वसूल केले. त्या गरीब महिलांनी स्वतःचे दागीने मोडून पैसे दिलेत. काही महिला एजंट, काही कार्यकर्ते पैसे वसुलीसाठी नेमले होते. याची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी म्हणजे या भुरट्यांचे सत्य समोर येईल. ज्या काँग्रेस पक्षाने लोकसभा, विधानसभेला अनेकांना डावलून या धंगेकरांना उमेदवारी दिली. त्यांनी फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांना वापरून आपला रंग दाखवला. हे कोणाचे होवू शकत नाही. मा. शिंदे साहेबांना यांचा अनुभव येईल. त्यावेळी बराच उशीर झालेला असेल. हे Who is Dhangekar नाही, तर He is Real Criminal Dhangekar हे सत्य तुमच्या समोर लवकरच येईल.’ असा समाचार मानकर यांनी घेतला आहे.