पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून आता मतदार यादीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रभागनिहाय मतदार यादी तयार करणे, मतदार यादी फोडणे, मतदान केंद्रानुसार मतदारांची यादी अंतिम करून सही शिक्क्यासह निवडणूक शाखेकडे सादर करणे आदीची जबाबदारी 2 महापालिका उपायुक्तांवर दिली आहे. त्यात उपायुक्त रवी पवार आणि निखिल मोरे यांचा समावेश आहे.






महापालिका कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘निवडणूक प्रशिक्षण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणे, मतदान केंद्रांची आखणी, मतदान यंत्र वापरण्याचे हाताळणे, उमेदवारी अर्ज प्रक्रिया, निकाल प्रक्रिया आदीचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षण कक्षाचे प्रमुख म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा यशदाचे सहयोगी प्राध्यापक राजीव नंदकर यांची नियुक्ती केली आहे. प्रशासन अधिकारी संगीता कोकाटे, महापालिकेच्या प्रशिक्षण प्रबोधिनीचे उप अधीक्षक संजय काळे यांची सहाय्यक कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे शहरातील महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ४१ प्रभागांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांना नोडल ऑफिसर म्हणून काम करून त्यांनी मतदार यादी विभागणीचे करवून घ्यावे लागणार आहे. पुणे शहराची लोकसंख्या लक्षात घेता व प्रभागानुसार लोकसंख्याची वर्गीकरण याचा अभ्यास केल्यास पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या सुमारे ५ हजार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध जबाबदाऱ्यांचे विक्रेंदीकरण करून ही कामे वेळेत व व्यवस्थित पार पाडली जावीत यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
पुणे महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहराची पूर्व व पश्चिम अशी विभागणी करून पश्चिम व उत्तरेकडील प्रभाग जबाबदारी म्हणून उपायुक्त रवी पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे महापालिका उपायुक्त रवी पवार यांच्याकडे प्रभाग क्रमांक १ ते १२, २५ आणि २७ ते ३५ अशा २२ प्रभागांची जबाबदारी दिली आहे. पुणे महापालिकेच्या पूर्वेकडील हडपसर कोंढवा सिंहगड रस्ता सातारा रोड व पेठ विभाग याची जबाबदारी उपायुक्त निखिल मोरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये पुणे महापालिकेचे प्रभाग क्रमांक १३ ते २४, २६ आणि ३६ ते ४१ अशा १९ प्रभागांची जबाबदारी दिली आहे.











