आसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या रूपाने पाकिस्तान 24 वर्षांत प्रथमच मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे. 19 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सातत्याने काही वाद निर्माण होताना दिसत आहे. आता ताजा वाद भारताच्या झेंड्यावरून झाला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या देशांचे झेंडे कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर लावण्यात आले आहेत. मात्र त्यात भारताचा ध्वज नाहीये. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांनी त्यावर संताप व्यक्त केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानला स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावे लागले आहे.
काय म्हणाले पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड?
पाकिस्तानने आपल्या स्टेडियममध्ये भारतीय ध्वज फडकावण्यास नकार दिल्यावर चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. हे प्रकरण तापल्यावर आता पीसीबीने आता प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डने (PBC) यावर उत्तर देत सांगितले आहे की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी केवळ पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्याच देशांचे झेंडे स्टेडियममध्ये फडकवले गेले आहेत.
पीसीबीच्या एका सूत्राने आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की, “तुम्हाला माहिती आहे की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान भारत आपले सामने खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये येणार नाही. कराचीच्या नॅशनल स्टेडियम, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम आणि लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ज्या देशांचे झेंडे फडकवले गेले आहेत जे तिथे खेळायला येणार आहेत.” भारत दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलमध्ये खेळणार आहे.
बघा व्हायरल व्हिडीओ
‘या’ देशांचे सामने होणार कराचीमध्ये
कराची स्टेडियमवर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंग्लंड संघांचे सामने होणार आहेत.
बीसीसीआय, पीसीबी आणि आयसीसी यांच्यात करार
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) स्पर्धा हायब्रीड मोडमध्ये बदलावी लागली. BCCI, PCB आणि ICC यांच्यात एक करार झाला, ज्या अंतर्गत पाकिस्तान क्रिकेट संघ येत्या काही वर्षात भारत-यजमान आयसीसी स्पर्धांमध्ये आपले सामने खेळणार नाही.