नामदेवशास्त्रींचं देहूतील किर्तन अखेर रद्द! धनंजय मुंडेंची पाठराखण करणं भोवलं

0

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींमुळं सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकेलेले मंत्री धनंजय मुंडे यांची भगवान गडाकडून पाठराखण करण्यात आली होती. भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आपण आहोत असं त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं होतं. त्यांच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्रात एक प्रकारे वादळचं निर्माण झालं.

वारकरी संप्रादयाच्या एका गटाकडून नामदेवशास्त्रींविरोधात उघडपणे भूमिका घेण्यात आली. त्यामुळं देहू इथं आयोजित कर्तनाचा कार्यक्रम अखेर नामदेवशास्त्री यांना रद्द करावा लागला आहे. त्यामुळं मुंडेंना पाठिंबा देणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे.

अधिक वाचा  मारणे टोळी सूत्रधार रुपेश मारणेच्या मुसक्या आवळल्या; भाजप कार्यकर्त्याला मारहाण ९ महिने होता फरार

नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांचं समर्थन करताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचंही समर्थन केलं होतं. या आरोपींनी हा गुन्हा करण्यापूर्वी त्यांना मारहाण झाली होती, याचाही मीडियानं विचार करावा, असं नामदेवशास्त्रींनी म्हटलं होतं. त्यामुळं त्यांच्या नेमक्या या भूमिकेवरुनच सध्या ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगारीचं समर्थन करणारी भूमिका मांडली असून याचा आम्ही निषेध करतो, याप्रकरणी नामदेवशास्त्रींनी त्वरीत वारकरी संप्रदायाची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आध्यात्मिक व वारकरी आघाडीनं पत्रकार परिषदेत दिला होता.

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

यावेळी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल मोरे यांनी म्हटलं होतं की, शास्त्री असं म्हणतात की माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. पण मी माझं विधान मागे घेतो आणि माफी मागतो असं सर्वांसमोर सांगावं. येत्या आठ दिवसांत हे झालं नाहीतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

यापार्श्वभूमीवर संभाव्य विरोधाचं वातावरण पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नामदेवशास्त्री यांनी देहू येथील भंडारा डोंगरावर होणाऱ्या आपल्या किर्तनाचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.