भाजपचं धक्कातंत्र, ‘या’ नामांकीत 5 आमदारांचं तिकीट कापणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचं जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपची दिल्लीत काल उमेदवार ठरवण्याबाबतची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सर्व जागांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी काही आमदारांना डच्चू देण्याचा देखील निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. सुमार कामगिरी केल्याच्या दावा करत भाजप पक्षश्रेष्ठींकडून काही विद्यमान आमदारांना विधानसभेच्या तिकीट वाटपात डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. भाजप पक्ष नेहमी धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. त्यामुळे भाजप या विधानसभा निवडणुकीतही धक्कातंत्र वापरुन अनेक बड्या चेहऱ्यांना तिकीट नाकारणार असल्याची चर्चा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्यांची तिकीटं कापली होती.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

भाजप कुणाकुणाची तिकीटं कापणार?
भाजपकडून या निवडणुकीतही काही विद्यमान आमदारांना तिकीट दिलं जाणार नसल्याची चर्चा आहे. यामध्ये वर्सोवाच्या आमदार भारती लव्हेकर यांचं देखील नाव आहे. भारती लव्हेकर यांचं मोठं सामाजिक कार्य आहे. भारती लव्हेकर यांनी महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बँक सुरू केली आहे. त्यांना भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी, शाळा आणि इतर ठिकाणी सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोजल मशीन बसवल्या आहेत. तसेच त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या, महिला आरोग्य यासाठी मोठं काम केलं आहे. पण त्यांचं तिकीट यावेळी कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी संजय पांडे यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

भाजपचे घाटकोपर पश्चिमचे विद्यमान आमदार राम कदम यांचंदेखील तिकीट धोक्यात असल्याची चर्चा आहे. राम कदम हे नेहमी चर्चेत असणारे आमदार आहेत. ते प्रसारमाध्यमांवर अनेकदा आपली भूमिका मांडताना दिसतात. पण सुमार कामगिरीचं कारण देत भाजप कदाचित त्यांचं तिकीट कापणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्याऐवजी घाटकोपर पश्चिममधून भाजप कुणाला उमेदवारी देणार? ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

याशिवाय भाजपचे शीव-कोळीवाडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तमिळ सेल्वन यांचं देखील तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. पक्षाकडून या मतदारसंघातून प्रसाद लाड किंवा राजश्री शिरवडकर यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे, तसेच घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पराग शाह या दोन्ही नेत्यांची उमेदवारी देखील धोक्यात असल्याची चर्चा आहे. त्यांच्याऐवजी पक्षाकडून इतर कुणाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा