बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालीय. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांना धारेवर धरत राजीनाम्याची जोरदार मागणी केलीय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनीही या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतलीय. दमानीया यांनी आज देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत तीस मिनिटे चर्चा झाल्याचं दमानीया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.






अंजली दमानीया पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?
“मी जवळपास 25 ते 30 मिनिटे त्यांना भेटली. त्यांचं म्हणणं आहे की, जे जे बीडला झालंय ते माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य आहे. त्याचं मी कुठेही समर्थन करत नाही. मी त्यांना हेच विचारलं की, तुम्ही राजीनामा का घेत नाहीत? सगळेच्या सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले. धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेस कसे आहेत, हे आज मी त्यांना दाखवलं आहे. त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय..म्हणून तुम्ही कोणत्याही परिस्थितीत राजीनामा घेतला पाहिजे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स यांनी जे डायरेक्शन्स आमदार आणि मंत्र्यांसाठी दिले होते, ते दाखवले, असं अंजली दमानीया म्हणाल्या.
“ते ऑफिस ऑफ प्रॉफिट कसे आहेत, हे गृह मंत्रालयाच्या 102 (a) आणि 129 या कलमानुसार हे दाखवून दिले.आमदार किंवा मंत्री स्वत:साठी किंवा त्याच्या घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही. तसच त्यांची असलेली दहशत आणि समर्थक..पण ते समर्थक नाहीत, ते दहशतवादी आहेत. त्यांनी ज्या प्रमाणे बीडमध्ये दहशत निर्माण केली आहे, ते सर्व फोटो आणि रिल्स त्यांनी शांतपणे पाहिले. त्यांनी असं सांगितलं आहे, उद्या दुपारी बारा वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मिटिंग आहे. त्यावेळी हे सर्व डिटेल्स आणि कागदपत्र मुख्यमंत्र्यांसोबत चर्चिले जातील. जे कृत्य केलं ते अतिशय निर्घृण होतं. अशा कृत्यांना महाराष्ट्रात कोणीही कुठेही थारा देऊ नये. म्हणूनच आपला लढा आहे असं मी त्यांना सांगितलं. त्याचंही तेच मतं होतं की यापुढे असं कधीही होऊ नये. संतोष देशमुख यांच्यासोबत झालेलं कृत्य महाराष्ट्रात परत घडू नये. म्हणून मी त्यांना म्हटलं की धनंजय मुंडेंचा राजीनामा तातडीने घेणं आवश्यक आहे”, असंही अंजली दमानीया म्हणाल्या.











