भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरूवारी नवी दिल्लीमध्ये निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुली आहेत.मनमोहन सिंग यांच्या तीनही मुलींनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. मनमोहन सिंग यांच्या मुली शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार आणि लेखिका आहेत. मनमोहन सिंग यांना तीन मुली आहेत. उपिंदर सिंग, दमन सिंग आणि अमृत सिंग अशी मनमोहन सिंग यांच्या मुलींची नावं आहेत.






उपिंदर सिंग : इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ, अशोका विद्यापीठातील प्राध्यापकांचे डीन
उपिंदर सिंग यांनी सेंट स्टीफन कॉलेज, दिल्ली आणि मॅकगिल विद्यापीठ, मॉन्ट्रियल येथून पदव्या प्राप्त केल्या. उपिंदर यांनी प्राचीन भारतीय इतिहासावर महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ज्यामध्ये प्राचीन आणि सुरुवातीच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि प्राचीन भारतातील राजकीय हिंसाचाराचा समावेश आहे. त्यांना हार्वर्ड आणि केंब्रिजसारख्या संस्थांकडून प्रतिष्ठित फेलोशिप मिळालेल्या आहेत. उपिंदर सिंग यांना 2009 मध्ये सामाजिक विज्ञानातील इन्फोसिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दमन सिंग, लेखिका
‘स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन आणि गुरशरण’ हे पुस्तक दमन सिंग यांनी लिहिलं, ज्यात त्यांनी वडील पंतप्रधान होण्यापूर्वीच्या त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा तपशील दिला आहे. 4 सप्टेंबर 1963 रोजी जन्मलेल्या दमन यांनी पर्यावरणविषयक समस्यांसह विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. दमन यांचे लग्न आयपीएस अधिकारी अशोक पटनायक यांच्याशी झाले आहे, त्यांना एक मुलगाही आहे.
अमृत सिंग, मानवाधिकार वकील आणि शिक्षणतज्ज्ञ
अमृत सिंग या अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन (ACLU) मधील स्टाफ ॲटर्नी आणि स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधील कायद्याच्या प्राध्यापक आहेत. अमृत यांनी केंब्रिज विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवली. ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञानात त्या पदव्युत्तर झाल्या, त्यानंतर येल लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी महत्त्वाच्या कायदेशीर खटल्यांवर काम केले. अमृत सिंग यांनी यापूर्वी ओपन सोसायटी इनिशिएटिव्हसाठी वकील म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये अध्यापनाचा समावेश आहे.
मनमोहन सिंग यांच्या तिन्ही मुलींनी केवळ वडिलांचा वारसा सांभाळला नाही तर शिक्षण, साहित्य आणि मानवाधिकार वकिलीमध्येही महत्त्वाचे योगदान दिले. मनमोहन सिंग यांच्या मुलींनी त्यांच्या कर्तृत्वाने सार्वजनिक जीवनात प्रभाव टाकला.
संजय बारूंच्या पुस्तकावर टीका
मनमोहन सिंग यांची मुलगी उपिंदर सिंग यांनी संजय बारू यांनी लिहिलेल्या ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वर जाहीरपणे टीका केली, या पुस्तकात मनमोहन सिंग यांचं नकारात्मक चित्रण करण्यात आलं होतं. त्यांनी “विश्वासाचा घोर विश्वासघात” आणि “अनैतिक” कृत्य असं म्हणत निशाणा साधला होता. या पुस्तकात आपल्या वडिलांच्या अधिकाराचे आणि त्यांच्या कार्यकाळातील काँग्रेस पक्षातील कामाचं चुकीचे वर्णन केल्याची टीका उपिंदर सिंग यांनी केली होती.
मनमोहन सिंग यांची दुसरी कन्या दमन सिंग यांनी त्यांच्या वडिलांवर एक पुस्तक लिहिले. त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक होते, ‘स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन आणि गुरशरण’. हे पुस्तक त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आलेल्या आव्हानांचा सूक्ष्म आढावा घेते.
मनमोहन सिंग यांची मोठी मुलगी उपिंदर सिंग यांचे वय 65 वर्षे आहे, त्यांचे पती विजय तांखा हे शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक आहेत, तसंच त्यांना दोन मुले आहेत. दमन सिंग 61 वर्षांच्या आहेत, त्यांचे पती अशोक पटनायक हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी होते. त्यांना एक मुलगा आहे. मनमोहन सिंग यांची तिसरी मुलगी अमृत सिंग 58 वर्षांची आहे.











