महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं. महायुतीने तब्बल 230 जागा जिंकल्या. त्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यात भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
मंत्रिपदासाठी कुणाची नावं चर्चेत?
महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनुभवी चेहरे मंत्रिमंडळात असतील. शिवाय नव्या आणि तरूण आमदारांना संधी देत समतोल साधण्याची कसरत महायुतीला करावी लागणार आहे. भाजपकडून आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा या नेत्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. शिवाय भाजप काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांना मंत्री करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत भाष्य केलं होतं. त्यामुळे कुल यांना संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
शिवसेना- राष्ट्रवादीकडून कुणाला संधी?
शिवसेनेकडून दीपक केसरकर, शंभूराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत यांनी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसंच काही नव्या चेहऱ्यांना देखील संधी दिली जाऊ शकते. अजित पवार गटाकडूनही काही नेत्यांवर महत्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे -पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. तर शिंदे सरकारमध्ये अदिती तटकरे या एकमेव महिला मंत्री होत्या. त्यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण खातं होतं. त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळतं का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित?
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. आज 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन उपमुख्यमंत्रीदेखील यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणार आहेत. अजित पवार राजभवनात पोहोचले आहेत. 11 वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे. शिवसेनेचे माजी खासदारही दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ७ खासदार आणि ४ माजी खासदार पंतप्रधानांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.