महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. एकूण 230 हून अधिक जागा महायुतीला मिळाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला मोठं अपयश या निवडणुकीत मिळालं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल स्वीकरत, यातून बोध घेऊन प्रामाणिकपणे लढत राहू असं म्हटलं आहे. सुळे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.






नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
विधानसभा निवडणुकीत मायबाप जनतेने जो कौल दिला तो अतिशय नम्रपणे आम्ही स्वीकारत आहोत. या निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करु असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. भविष्यातील सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहू. शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण व समाजातील प्रत्येक घटकांच्या हक्काची व स्वाभिमानाची लढाई आम्ही खंबीरपणे कायम लढत राहू असे सुळे यांनी म्हटलं आहे.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ
आता जरी आम्ही पराभूत झालो असलो तरी आपल्या मूल्यांसाठी प्रांजळपणे काम करत राहू आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची ही पालखी निष्ठेने, सर्व शक्तीनिशी पुढे नेऊ असे सुळे यांनी म्गटलं आहे. या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण काम कराल ही अपेक्षा आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी, निवडणूक आयोग,निवडणूक कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रशासन, प्रसारमाध्यमे, सोशल मिडिया आदी सर्वांनी सक्रिय योगदान देऊन लोकशाहीचा हा उत्सव जागता ठेवून पार पाडला, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
कोणत्या पक्षाचा किती जागांवर विजय झाला?
महायुती- 236
मविआ- 49
इतर- 3











