सध्या लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची चर्चा पाहायला मिळत आहे. आता उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पुन्हा हातमिळवणी करण्याबद्दल भाष्य केले आहे. मोदी यांनी महाराष्ट्राचा घात केला आहे. त्यांच्याबरोबर हातमिळवणी कदापि शक्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला मुलाखत दिली.






या मुलाखतीत उद्धव ठाकरेंना उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे उत्तर दिले. गेल्या काही दिवसातली पंतप्रधान मोदींची वक्तव्यं पाहिलीत तर ते तुमच्याविषयी भरभरून बोलताहेत, त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटतंय, असे विचारले असता उद्धव ठाकरेंनी “लोकांना वाटतंय की, हे शिवसेनेत येताहेत की काय!” असे म्हटले.
“महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत मी खतम होऊ देणार नाही”
त्यावर संजय राऊतांनी ते शिवसेनेत येताहेत की काय याऐवजी ‘नकली सेने’विषयी त्यांचं एवढं प्रेम का उफाळून येतंय. त्यामागे असं सांगितलं जातंय, काही सूत्रं जाहीरपणे म्हणताहेत की, मोदी यांनी तुमच्याविषयी गोड बोलून उद्याच्या निकालानंतर एक खिडकी तुमच्यासाठी उघडली आहे, असे म्हणताच उद्धव ठाकरेंनी कुठली खिडकी? असे म्हटले. यानंतर संजय राऊतांनी “उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय?” असा प्रश्न विचारला.
त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही पिक्चरचे सेट पाहिलेत कधी? बाळासाहेबच एकदा मला युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये घेऊन गेले होते. तिथे छान सेट बनवले होते. जसे आपल्या नितीन देसाईंनी बनवले होते. त्यात अशा भिंती, खिडक्या असतात आणि त्या खिडकीतून पाठी बघितलं तर टेकू लावलेले असतात, आत काहीच नसतं. अशा खिडकीचा काय उपयोग? माझ्या महाराष्ट्राचं, अभिमानाचं, स्वाभिमानाचं, अस्मितेचं एक वेगळंच मंदिर बांधतोय. त्यामुळे मला असल्या फटींची आणि दरवाजांची गरज नाही. मी माझ्या महाराष्ट्राची लढाई लढतोय. देशाची लढाई लढतोय. लोकांचा आशीर्वाद मला पाहिजे आणि ही लढाई फक्त माझी नाही ती जनतेचीही आहे. कारण नाहीतर हे महाराष्ट्राला खतम करतील, जे दिसतंय. महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत मी खतम होऊ देणार नाही.”
वॉशिंग मशीन काय चालणार?
“भाजपला जो करंट शिवसेनेनं दिला होता तो त्यांचा करंटच काढल्यानंतर वॉशिंग मशीन काय चालणार? आता त्यांच्यावर ही पाळी का आली? अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती तिला तुम्ही नकली शिवसेना म्हणताय आणि नकली लोकांना मांडीवर घेऊन त्यांना ‘बाळा जो जो रे’ का करताय तुम्ही”, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.











