राज्यात राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेतेही मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही प्रचारासाठी दौऱ्यांच्या माध्यमातून आघाडी घेतली आहे. गुरुवारी सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी पुण्यातील सभेला संबोधित केले होते. त्यानंतर, आज बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार होम ग्राऊंडवर जनतेशी संवाद साधत आहेत. या सभेदरम्यान, उपस्थितांपैकी एकाने शरद पवार बोलण्यासाठी उभे राहिलेल्या व्यासपीठाकडे एक वस्तू फेकली, ती वस्तू त्यांच्या बॉडीगार्डने कॅच पकडून घेतली. यावेळी, बॉडीगार्डच्या चेहऱ्यावरील हावभावही संतापजनक होते.






बारामती येथील सभेतून शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी, भाषणाच्या सुरुवातीलाच कन्हेरी गावचा उल्लेख करत गावकऱ्यांची मने जिंकली. गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे आपण निवडणूकीची सुरुवात कन्हेरी येथून करतो असे ते म्हणाले. यावेळी, शरद पवारांनी सभास्थळी उपस्थित एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला नावानिशी ओळखले, तुम्ही गुरुजी आहात का ? (पांडुरंग झगडे असे नाव) असे शरद पवारांनी म्हटले. त्यानंतर, त्यांचे वय विचारले असता, झगडे यांनी 94 असल्याचे सांगताच, आपण माझ्यापेक्षा वडील आहात का? असेही पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांचे भाषण सुरु असतानाच सभेतील उपस्थितांकडून काहीतरी वस्तू त्यांच्या दिशेने फेकण्यात आली, ती वस्तू शरद पवारांच्या पाठिमागे उभे असलेल्या बॉडीगार्डने कॅच पकडली. त्यावेळी, त्यांच्या चेहऱ्यावर संतापाचे, रागाचे हावभाव दिसून आले.
दरम्यान, माहिती घेतली असता संबंधित व्यक्तीने लीपर माईक त्यांच्या दिशेने फेकला होता. त्यामुळे, हा कुठलाही अनुचित प्रकार नसून माईक देण्यासाठी चुकीच्या पद्धतीने संबंधिताने प्रयत्न केला.











