अजबच पुणे तिथे काय उणे! पुणेकरांनीचं मांडला जाहीरनामा; शहरातील खासदाराने हे करावे तरच मिळेल आमचं मत!

0

पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी, आणि अधिक सुखकर होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रभावीपणे बाजू मांडावी, धोरणे ठरवावीत आणि आवश्यकते नुसार निधी उपलब्ध करून आणावा. शहरासाठी पुरेसे पाणी आणि कार्यक्षम, शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच शहरातील नैसर्गिक वारसा स्थळे म्हणून टेकड्यांचे संवर्धन करण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी व बाजू मांडावी, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुणेकर नागरिकांच्या जाहीरनाम्याचा समावेश राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बालभारती- पौड फोटा दरम्यान महापालिकेने रस्ता प्रस्तावित केला आहे. त्याला पर्यावरणप्रेमी नागरिकांनी गेल्यावर्षी १५ एप्रिल रोजी रस्त्यावर उतरून तीव्र विरोध दर्शविला. लोकभावनेची दखल घेऊन महापालिकेने रस्त्याचे काम तूर्त थांबविले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी जाहीरनाम्याद्वारे काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याचा राजकीय पक्षांनी स्वीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

पर्यावरणाच्या संतुलनासाठी आवश्यक उपाययोजना

– बालभारती रस्ता, उच्चक्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गामुळे (एचसीएमटीआर) तीन टेकड्या फोडाव्या लागणार आहेत. तसेच पाषाणधील पंचवटीपर्यंत जाणारे दोन बोगदे टेकड्या फोडून होणार आहेत. हे तिन्ही प्रकल्प रद्द करणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे शहरातील पाणीसाठ्यावर परिणाम होणार असून शुद्ध हवा कमी होणार असून तापमान वाढणार आहे.

– शहराच्या भूगर्भात किमान ४ टीएमसी पाणीसाठा आहे. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक रिचार्ज सिस्टीमची वैज्ञानिक पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे

– भूजल पुर्नभरणासाठी मोकळ्या सुविधांच्या जागा (ॲमेनिटी स्पेसेस) संरक्षित केल्या पाहिजेत. शहरात ८०० ॲमिनिटी स्पेसेस, २०० उद्याने आहेत. तेथे पावसाच्या पाण्याची साठवण व्हावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

– वेताळ टेकडीचे सुमारे ८०० हेक्टर क्षेत्र नैसर्गिक पावसाच्या पाण्याचे पाणलोट क्षेत्र निर्माण करते. तसेच कोथरूड, वेताळ टेकडी, चतुःश्रृंगी, पाषाण, बावधन, विश्रांतवाडी, विमाननगर, धनकवडी, येवलेवाडी येथील डोंगर उतार क्षेत्र भूजल पुनर्भरण क्षेत्र म्हणून संरक्षित करावे

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

– शहरात २५० हून अधिक लहान-मोठ्या प्रवाहांचे जाळे आहे. ते पुनरुज्जीवित करणे गरजेचे

– शहरातील आणि भोवतालच्या टेकड्यांचे संवर्धन गरजेचे, त्यावर हिरवाई टिकविण्यासाठी प्रयत्न हवेत.

– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली पाहिजे. मेट्रोचे उपनगरांत विस्तारीकरण हवे. मेट्रो, बस आणि रिक्षा यांच्यात प्रवासासाठी समन्वय हवा.

– पीएमपीच्या ताफ्यात ३ हजार बस हव्यात. सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण १०- १२ टक्क्यांवरून वाढवून ३० टक्क्यांपर्यंत व्हावे, यासाठी उपाययोजना हव्यात

– वेताळ टेकडीचा समावेश राज्य सरकारच्या नैसर्गिक वारसा क्षेत्रात समावेश करावा तसेच या क्षेत्राचा समावेश महापालिकेच्या विकास आराखड्यात करावा.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

– सुषमा दाते ः शहराच्या पर्यावरणाचे प्रश्न महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मांडण्यासाठी पुण्यात नेतृत्त्वाची पोकळी आहे. नव्या खासदाराने ही भूमिका बजावली पाहिजे आणि शहराच्या पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे, अशी नागरिकांची इच्छा आहे. पाणी, शुद्ध हवा यासाठी टेकड्या, नद्या, प्रवाह महत्त्वाचे आहेत. त्यांच्यावर घाला घालण्यापेक्षा त्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.

– प्राजक्ता दिवेकर ः हा जाहीरनामा म्हणजे एखाद्या रस्त्याला विरोध नाही तर, संपूर्ण शहराच्या पर्यावरणाचा विचार करून तयार करण्यात आला आहे. भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यात टेकड्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे त्यांचे संवर्धन आवश्यक आहेच. तसेच येत्या काही वर्षांत पाण्याचा शहरात तुटवडा होऊ शकतो. पुण्याची अवस्था बंगळुरूसारखी होऊ नये म्हणून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठीच आम्ही विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.