शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोरोना लसीच्या वक्तव्याचा व्हिडिओ दाखवला. ‘यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला आहे, काय माहिती. कोविडची लस मोदींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का? संशोधक गवत उपटत होते का? असे सगळे अंधभक्त आणि त्यांचे गुरू म्हणल्यानंतर यांना कोणतं व्हॅक्सिन द्यायचं ते ठरवावं लागेल. यांना व्हॅक्सिन देण्याची गरज आहे’, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.






‘राहुल गांधी अमेरिकेमध्ये गेले होते, तेव्हा म्हणाले ब्रम्हदेव बाजूला बसला तर हे ब्रम्हांड कसं चालवायचं हे त्यांना सांगतील. लस त्यांनी बनवली असेल तर हे नक्कीच ब्रम्हांड चालवत असतील’, असा निशाणाही उद्धव ठाकरेंनी साधला.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोबतच फडणवीस यांनी त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण व्हिडिओही ट्वीटरवर शेअर केला आहे. ‘अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही… असो, आता ऐका… याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला … म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला !’, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.











