तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी देखील आता महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. राज्यात त्यांनी पक्ष विस्ताराला सुरुवात केली आहे. विविध पक्षातील अनेक नेते हे भारत राष्ट्र समिती बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र लढणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेकांना आपल्याला उमेदवारी मिळणार नाही असं वाटत आहे. त्यामुळे ते बीआरएसमध्ये प्रवेश करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाला टोला
यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाला देखील जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे हे देखील एकत्र निवडणूक लढवतील, त्यामुळे अनेकांना वाटतं आपल्याला उमेदवारी मिळणार नाही. ज्यांना असं वाटतं ते बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. बीआरएसच्या जाहिरातीसाठी एवढा पैसा कुठून येतो असा सवाल करतानाच अशीच जाहिरातबाजी शिंदे आणि फडणवीस सरकारची सुरू असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
कारखाने उशिरानं सुरू होण्याची शक्यता
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत देखील चिंता व्यक्त केली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे कारखाने वेळेत सुरू होण्याबाबत साशंकता आहे. कारखाने कधी सुरू करायचे हा सरकारचा अधिकार आहे, मात्र धरणात पाणी नसल्यानं ऊस पिकाला पुरेसं पाणी मिळणं अवघड असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.