येरवडा जेलची सुरक्षा भेदून…; कैद्यांची झडती घेताना असं काही सापडलं की पोलीसही हैराण

0

पुणे : पुण्यात गुन्ह्यांच्या घटना वारंवार समोर येत असताना आता थेट येरवडा कारागृहातूनच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येरवडा कारागृह मोबाईल फोन सापडणं ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, कारागृहात मोबाईल पुन्हा जातो कसा हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात मोबाईल सापडल्याचा प्रकार घडल्यानंतर कारागृह प्रशासनाने घेतलेल्या झडतीत त्यांना सीमकार्ड नसलेला मोबाईल सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहाची कडक सुरक्षा भेदून मोबाईल आतमध्ये गेलाच कसा हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकरणी अज्ञात आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुरूंग अधिकारी अतुल तुवर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुवर हे येरवडा कारागृहात तुरूंग अधिकारी पदावर कार्यरत आहेत. कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांच्या बरॅक तसेच आजुबाजुच्या परिसराची नियमित झडती घेत असतात. दि. ६ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्कल १ येथील बरॅक क्रमांक ८ परिसरामध्ये तुरूंगाधिकारी ए. एस. कांदे हे झडती घेत असताना त्यांना एक इंटेल कंपनीचा मोबाईल बॅटरीसह पण कोणतेही सीमकार्ड नसलेला सापडला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

याबाबत प्रभारी अधीक्षक एस. बी. पाटील यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर तुवर यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कारागृहात मोबाईल घेवून जाण्यास सक्त मनाई असताना हा मोबाईल हॅन्डसेट कोणीतरी अज्ञात आरोपीने कट करून व नियमांचा भंग करून येरवडा मध्यवर्ती कारागृहात घेऊन गेल्याने अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नेमका हा फोन जेलमध्ये कसा गेला? यासंबंधी पोलीस अधिक माहिती घेत आहेत.