शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर तुफान गर्दी; गडाचे दरवाजेही बंद; छत्रपती संभाजीराजे हे आवाहन

गडाचे दरवाजे, रोप वे बंद तरी गर्दी काही कमी होईना; नाईलाजाने शिवभक्त फिरले माघारी

0

350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी यंदा भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने रायगडावर येत आहेत. काही ठिकाणी तर विशेष गाड्या देखील सोडण्यात आल्या आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी असल्या तरी काही भाविकांना मात्र गडावर जाता आलं नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ती नियंत्रणात आणणं हे देखील पोलीस प्रशासनासमोरचं आव्हान आहे. नाईलाजाने असंख्य शिवभक्त माघारी फिरले आहेत.

दुर्गराज रायगडावर सध्या जवळपास अडीच लाख भाविक जमले आहेत. गडाच्या खाली जवळपास ५०- ७५ हजार भाविक आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सध्या गडावर असलेले लोक ९ – १० च्या दरम्यान गड उतरतील, त्यानंतर खाली असलेल्या लोकांना वरती सोडले जाईल. सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गड उतार होणार नाही, याची शाश्वती मी देतो असं छत्रपती संभाजीराजे भाविकांशी बोलतना म्हणाले. वाहनांना गडापर्यंत जाण्यास पहाटेपासून पोलिसांचा मज्जाव केला आहे. त्यामुळे शिवभक्तांना माघारी फिरावं लागलं. गर्दी वाढू नये यासाठी रोप वे बंद केला आहे. रायगडावर लाखोंच्या संख्येनं शिवभक्त दाखल झाले आहेत.