जेजुरी खंडोबा मंदिराच्या सात जणांच्या विश्वस्त मंडळात जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीसाठी सहधर्मदाय आयुक्तांनी कोणते निकष लावले, असा प्रश्न उपस्थि केला जात आहे. या निवडीविरोधात ग्रामस्थांनी आपला रोष विविध मार्गांनी व्यक्त केला. सध्या जेजुरीत ग्रामस्थांचे चक्री उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा सोमवारी (ता. ५ जून) अकरावा दिवस आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ग्रामस्थांची एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी जेजुरी बंद ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय दोन दिवसात होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.






जेजुरीबाहेरील जास्त विश्वस्तांची निवड केल्याने जेजुरीकर आक्रमक झाले आहेत. या निवडविरोधात ग्रामस्थांनी यापूर्वी पुणे-पंढरपूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. सहधर्मदाय आयुक्तांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवदेन दिले आहे. या विश्वस्तमंडळावर जास्तीत जास्त जेजुरीकरांची निवड होणे गरजेचे असल्याचा दावा ग्रामस्थ करीत आहेत.
आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत जेजुरीत चक्री उपोषणाचा मार्ग आंदोलकांनी आवलंबला आहे. दरम्यान, जेजुरीत मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर महारांजांच्या पालखीची सेवा करणार नसल्याचाही इशारा जेजुरीकरांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या वतीने न्यायालयीन लढाईचीही तयारी सुरू झाली आहे. सहधर्मदाय आयुक्तांकडे विश्वस्त निवडीबाबत पुनर्विचार करण्याबाबत सोमवारी (ता. ५) याचिका दाखल करण्यात आली.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी जेजुरीत सर्व ग्रामस्थांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीला ग्रामस्थांसह पुजारी, व्यापारी, दुकानचालक, सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जेजुरी बेमुदत बंद ठेवण्याबाबत चर्चा झाली. मात्र दोन दिवसात पुन्हा एक बैठक घेऊन त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जेजुरीबंद झाली तर येथे येणाऱ्या भाविकांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे जेजुरीकर अंतिम निर्णय काय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.











