मागील काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या. या घटनेला काही दिवस होत नाहीत, तोपर्यंत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला. उद्धव ठाकरे यांनीही एक पाऊल पुढे येत युतीचा प्रस्ताव स्विकारला. दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन होताना दिसलं. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील, असंही बोललं जातंय. याचं कारण म्हणजे मागच्या १५ दिवसांत दोन्ही नेत्यांमध्ये वाढलेल्या भेटीगाठी.
खरंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर येणं टाळत होतं. एका मंचावर एकत्र आले, तर दोघं एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र मागच्या १५ दिवसांत तीन वेळा वेगवेगळ्या कारणांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी झाल्या आहेत. ते बैठकांना हजर राहिल्याचं दिसलं आहे. या घडामोडींमुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची चर्चा आता नव्याने सुरू आहे. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आता सूचक विधान केलं आहे.
शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, तर आपली हरकत नाही. दोन्ही नेते जे काही निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित च आहोत. कौटुंबीक संबंध हे आमचे फार जुने आहेत. आमचे राजकीय मतभेद जरी झाले असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते एनडी पाटील यांचा दाखला दिला. त्या म्हणाल्या की, “एनडी पाटील आणि शरद पवारांचे टोकाचे मतभेद होते. तरीही आम्ही, आमच्या नात्यांमध्ये कधीही कटुता आणली नाही. आता दादा जर सॉफ्ट होत असतील तर त्यात गैर काय? शरद पवारांनी या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेकदा टीका केली आहे. पण हे दोन्ही नेते एकमेकांना आदरपूर्ण भेटतात, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.