तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आपल्या भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या विस्तारासाठी लवकरच नागपूरला येणार आहेत. नागपूरमध्ये पक्षाचे कार्यालय उघडण्यात येणार आहे आणि त्याचे उद्घाटन राव यांच्या हस्ते केले जाणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आगामी महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शनिवारी पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त नागपूरमध्ये पक्ष कार्यालय उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. सोमवारी इंदोरा परिसरात पक्षाचे समन्वयक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.






बैठकीत संघटनेचा विस्तार आणि निवडणुकीत भागीदारी यावर जोर देण्यात आला. तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश करवून घेतला जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी विधानसभा संघटक प्रवीण शिंदे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.
तेलंगणाच्या हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शिंदे यांचे पक्षात स्वागत केले. गौरव जैन, रुपेश ठाकरे, प्रमोद कावळे, शैलेंद्र फुलझेले, अमित बावने, रितेश सायरे, प्रजोत सातकर, सूर्यकांत थूल, चंदन राजभर, निखिल शेंडे, कमलेश साखरे, संजय हाडे, आदित्य तायडे हेसुद्धा पक्षात दाखल झाले आहेत.
तेलंगणामध्ये ज्या प्रकारे मुख्यमंत्री केसीआर यांनी गेल्या दोन टर्ममध्ये विकास केला, तसाच महाराष्ट्रात करण्याचा बीआरएसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांचा विचार आहे. केसीआर यांचा बीआरएस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकतीने उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र हे नागपूर शहर असणार आहे.
बीआरएसने आपल्या विस्ताराची सुरुवात नांदेड जिल्ह्यापासून केली. मागील चार महिन्यांत के. चंद्रशेखर राव यांनी नांदेड आणि लोहा येथे दोन जाहीर सभा घेतल्या आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच येथील मुस्लीम मतांवर भारत राष्ट्र समितीचा डोळा आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधून केसीआर लोकसभा लढण्याची अधिक शक्यता असल्याचेही बोलेल जात आहे. के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये ते नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर येथून लोकसभा निवडणूक लढू शकतात, अशी माहिती समोर येत आहे.











