जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी; नेमकं प्रकरण काय?

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित कथित गैरव्यवहाराबाबत ईडीकडून चौकशी होणार आहे. कोहिनूर सीटीएनएलमधील IL&FS समूहाच्या इक्विटी गुंतवणुकीशी संबंधित ही चौकशी आहे. दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर जयंत पाटील हे ईडी अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.

दुसरीकडे, ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी ईडीच्या बॅनरबाजी केली आहे. तर मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबई दाखल झाले आहेत. तर अन्य कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी आणि भाजप विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

नेमकं प्रकरण काय?

ईडीकडून आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली असतनाही मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर ही चौकशी करण्यात येत आहे. आयएल अॅण्ड एफएस या कंपनीने 2018 मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता. आयएल अॅण्ड एफएस कंपनीने कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचा आरोप आहे. ईडीने याप्रकरणी कंपनीचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर जाऊन तपास केला आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर या चौकशीची सुरुवात झाली होती. ऑगस्ट 2019 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही या प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. 2005 मध्ये राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी कोहिनूर मिल 3 आणि कोहिनूर सीटीएनएलची स्थापना केली. मात्र राज ठाकरे या प्रकल्पातून बाहेर पडले होते. आयएल अॅण्ड एफएस यांनी विविध कंपन्या व संस्थांना दिलेल्या कर्जांबाबत ईडीला संशय आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

दुसरीकडे ईडीने अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेवून चौकशी केली होती. या चौकशीनंतर अनेक मोठ्या लोकांची नावेदेखील यामध्ये होती. यात जयंत पाटील यांचेही नाव होते. जयंत पाटील यांच्या ओळखीच्या काही संस्थांना आयएल अँड एफएस प्रकरणातील कंपन्यांनी कमिशन रक्कम दिल्याचा आरोप ईडीचा आहे. त्यामुळे ईडीला आता त्यांची चौकशी करायची आहे. मात्र या कंपनीशी आपला संबंध नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

माझ्या नावावर एकही घर नाही – जयंत पाटील

“माझ्या नावावर एकही घर नाही. सांगलीतील घर वडिलांच्या नावाने होते. त्यांच्या पश्‍चात ते घर आईच्या नावावर झाले असून आता आईच्या पश्‍चात नाव बदलण्याचे काम सुरू आहे. कासेगावमध्ये थोडीफार शेती आहे. मात्र, वाटण्या झालेल्या नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलणार्‍यांना अडकविण्याचे काम सध्या सुरू असून मी अशा चौकशीला भिण्याचे कोणतेच कारण नाही,” असे जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन