IPLमधील पॉईंट्स टेबलबरोबरच ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठीची शर्यतही झाली रंगतदार

0
3

आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या ४८ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत केले. या विजयासोबतच गुजरातने आयपीएलमधील प्लेऑफसाठी आपली दावेदारी अधिकच भक्कम केली आहे.

दरम्यान, या सामन्यानंतर आयपीएलमधील ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीमध्येही रंगत आली आहे. गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराट कोहली आता सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. तर रशिद खानने ३ विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या मोहम्मद शमीशी बरोबरी केली आहे.

शुभमन गिलने यंदाच्या आयपीएलमध्ये १० सामन्यांत ३७५ धावा काढल्या आहेत. त्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आता शुभमन ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर ९ सामन्यांत ३६४ धावांसह विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस ९ सामन्यातील ४६६ धावांसह अव्वलस्थानी आहे. तर राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा सलामीवीर डेवॉन कॉनवे ४१४ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

तर पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये गुजरात टायटन्सच्या दोन गोलंदाजांनी पहिल्या दोन क्रमांकावर कब्जा केला आहे. गुजरातचा मोहम्मद शमी आणि रशिद खान यांनी प्रत्येकी १८ विकेट्स टिपले आहेत. त्यात सरस इकॉनॉमीच्या जोरावर शमीने अव्वलस्थान पटकावले आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा गोलंदाज तुषार देशपांडे या यादीमध्ये १७ विकेट्सह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंह १६ विकेट्ससह चौऱ्या आणि मुंबईचा फिरकीपटू पीयूष चावला १५ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.