वेताळ टेकडीसाठी पर्यावरणप्रेमी एकवटले!मोर्चामध्ये नागरिकांसह संस्था, संघटनाही सहभागी

0

पुणे : वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या ‘वेताळ टेकडी वाचवा’ मोर्चात शहर आणि परिसरात काम करणाऱ्या पर्यावरण संस्था व त्यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने भाग घेतला. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या आंदोलनाच्यानिमित्ताने आपली ताकद महापालिका प्रशासनाला दाखवून दिली.

तळजाई टेकडी अभियान, लोकायत, नागरिक चेतना मंच, पंचवटी उत्कर्ष सेवा संस्था, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट, औंध विकास मंडळ, असोसिएशन ऑफ नगर रोड सिटिझन्स फोरम, मिशन भूजल, परिसर, स्वच्छता कामगार संघटना, आम्ही पुणेकर, प्रवासी मित्र आदी विविध संघटनांनी सहभाग घेतला.

माझे भविष्य धोक्यात…

अवघ्या सहा महिन्यांचा शिवांक वडील भूषण जैन यांच्या खांद्यावर बसून गळ्यात ‘माझे भविष्य धोक्यात आहे’ असा फलक गळ्यात घालून सहभागी झाला होता. सोबत त्याची आईही होती. अनेक पालक आपल्या लहान मुलांना खांद्यावर, कडेवर घेत टेकडीच्या संरक्षणासाठी आले होते. शहरीकरणाचे वाढते जाळे, त्यात जंगलांचा होणारा ऱ्हास, काँक्रिटचे वाढते जंगल आदी मुद्द्यांबाबत नागरिक चिंता करीत होते.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

विकास करा, पण पर्यावरणाशी खेळ नको

‘‘वाढत्या लोकसंख्येमुळे विकास ही शहराची नक्कीच प्राथमिक गरज आहे. पण ती पूर्ण करताना पर्यावरणाशी प्रशासन का खेळत आहे? असा प्रश्‍न या वेळी नागरिकांनी केला. विकासकामे करण्यासाठी आम्ही खचितच अडथळे आणणार नाही. मात्र ज्या प्रकल्पांमुळे पर्यावरणाला धोका आहे,

तसेच टेकड्या व जंगलांवर संकटे येतील, असे प्रकल्प पुणेकर म्हणून आम्हाला नकोत. प्रशासनाने रस्त्यांसाठी जी काही विकासकामे करायची आहेत ती करावीत, पण टेकड्या आणि जंगलांवर अतिक्रमण करू नये,’’ अशी आमची मागणी असल्याचे अजय कुलकर्णी, देवयानी कुलकर्णी, अमित शहाणे, सुरेखा नवरे व धनंजय काळे या तळजाई टेकडी अभियानाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा

अशी होती स्थिती…

– पावसाचा अंदाज घेत रेनकोट व छत्री घेऊन अनेक जण सहभागी

– आकर्षक पद्धतीने फलक व घोषणा करण्यात आल्या

– मोर्चादरम्यान वेताळबाबा चौक ते जर्मन बेकरीपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा

– वाहतूक कोंडी होऊ नये म्हणू आंदोलकांचे प्रयत्न

– हलगीच्या ठेक्यावर नाचत टेकडी वाचविण्याच्या घोषणा

नागरिक हे म्हणतात…

ज्या भागात आधीच मेट्रो प्रकल्प आहे, त्या भागात पुन्हा एका रस्त्याची गरज का? त्यापेक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर महापालिकेने जोर दिला पाहिजे. अशा प्रकल्पांमुळे फक्त या चौकातील कोंडी दुसऱ्या चौकात ढकलण्याचा प्रकार घडेल.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

– नागरिक

वेताळ टेकडीवर आम्ही अनेक वर्षे जातो. शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नामशेष होत चाललेल्या टेकड्या वाचविण्यासाठी आम्ही या मोर्चात आलो. शहरात फक्त कॅंटोन्मेंट परिसरातच हिरवळ आहे. टेकड्या जोपासल्या पाहिजेत.

– नागरिक

ही टेकडी वाचविण्यासाठी आम्ही सुटी काढून सहकुटुंब औंधवरून आलो आहोत. आम्ही रोज सकाळी चालण्याच्या व्यायामासाठी येथे येत असतो. येथे रस्ता झाला तर जैवविविधता लयाला जाईल.

– नागरिक

टेकडी वाचविण्यासाठी मोर्चात भाग घेण्यासाठी मी मुंबईवरून आले आहे. काही वर्षांपूर्वी शिक्षणासाठी पुण्यात असताना, वेताळ टेकडी भावली होती. ती कायम असावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

– नागरिक