पूणे महापालिकेत ६ वर्षानंतर १३२ अभियंत्यांच्या बदल्या; पुढील टप्पा लिपिक, वरिष्ठ लिपिक?

0

पुणे : राजकीय वशिला, अधिकाऱ्यांची लॉबिंगमध्ये वर्षानुवर्षे एकाच खात्यात कनिष्ठ अभियंता करत आहेत. बदल्या झाल्या तरीही ठराविक जणांना अभय दिले जात होते. मात्र, या प्रकाराबद्दल आर्थिक आरोप झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने बदलीपात्र १३२ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या आज करून टाकल्या. विशेष म्हणजे यापूर्वी ज्या खात्यात काम केले नाही अशाच ठिकाणी त्यांना बदली दिल्याने मर्जीतील कनिष्ठ अभियंत्यांना धक्का बसला आहे.

पुणे महापालिकेत दर तीन वर्षानंतर कर्मचारी, अधिकाऱ्यांची बदली केली जाते. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांची बदली हे आयुक्तांच्या अधिकारात केली जाते. तर त्या खालील वर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकारात केल्या जातात. २०१७ मध्ये महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तीन वर्षानंतर बदल्या होणे अपेक्षीत असताना त्या झाल्या नाहीत. बदल्या करण्याचा प्रयत्न झाला असता राजकीय, तसेच अधिकाऱ्यांचा दबाव आणून बदल्या टाळण्यात आल्या. यासंदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिकेत बदल्यांच्या कामात लाखो रुपयांचे घेत असल्याचा आरोप करत त्याबाबत तक्रार केल्याने खळबळ उडाली होती.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

सामान्य प्रशासन विभागाने कनिष्ठ अभियंता पदाच्या बदल्या करण्यासाठी एकाच ठिकाणी सर्वात जास्त काळ सेवा केली आहे अशांची यादी तयार केली. एका खात्यातील २० टक्के पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या एकाच वेळी करता येत नाही. त्यानुसार प्राधान्यक्रम लावून बदलीपात्र १३२ कनिष्ठ अभियंत्यांची बदलीचे प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यातील १०९ स्थापत्य शाखा, ५ यांत्रिकी शाखा व १८ विद्युत शाखेतील अभियंत्याची बदली करण्यात आली.

जाहीरपणे झाल्या बदल्या

पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज सकाळी १३२ कनिष्ठ अभियंत्यांना एकत्र करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकाला तुम्ही यापूर्वी ज्या विभागात काम केले नाही अशाच विभागात बदली करून घेण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे ज्यांना यापूर्वी बांधकाम, पथ, घनकचरा यासह इतर विभागात काम करण्याची संधी मिळाली नव्हती येथील पर्याय निवडता आला. तर अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कनिष्ठ अभियंत्यांना मात्र कमी महत्त्वाचे खाते निवडावे लागल्याने महापालिकेत चर्चा रंगली होती.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

‘‘सहा वर्षानंतर बदलीपात्र १३२ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कनिष्ठ अभियंत्यांना त्यांना ज्या खात्यात काम केले नाही अशा ठिकाणी काम करण्याची संधी दिली आहे. पुढील टप्प्यात लिपिक, वरिष्ठ लिपिक यांच्या बदल्या केल्या जातील. ’’

– सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग