दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज (ता. ५) कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडत असून सुमारे कोट्यवधी मतदार सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या कालावधीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दिल्लीत यावेळी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत होत असली तरी खरा मुकाबला ‘आप’ आणि ‘भाजप’मध्ये होणार आहे.






मागील सलग दोन निवडणुकांत आम आदमी पक्षाने बहुमताचे सरकार बनविले होते. त्यामुळे यावेळची निवडणूक जिंकत हा पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करण्याची हॅट्ट्रिक साधणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शाळा, महाविद्यालयांना सुटी
मागील म्हणजे २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकत विधानसभेवर कब्जा केला होता. त्यावेळी भाजपला अवघ्या ८ जागा जिंकता आल्या होत्या तर काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि सरकारी-खासगी कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
यमुना नदीचे प्रदूषण तसेच अन्य स्थानिक मुद्द्यावरून यावेळचा प्रचार गाजला होता. किमान ५५ जागा जिंकत पुन्हा सत्ता काबीज करू असा विश्वास आप नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. तर यावेळी ”आप” चे जहाज यमुना नदीत बुडणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
यांचे भवितव्य पणाला
अरविंद केजरीवाल (आप)
मुख्यमंत्री आतिशी (आप)
मनीष सिसोदिया (आप)
सत्येंद्र जैन (आप)
प्रवेश वर्मा (भाजप)
रमेश बिधुडी (भाजप)
संदीप दीक्षित (काँग्रेस)
अलका लांबा (काँग्रेस)
मतदानाची व्याप्ती
१.५६ कोटी – एकूण मतदार
१३ हजार ७६६ – दिल्लीतील मतदान केंद्रे
७३३ – केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी सोय
२२० – निमलष्करी दलाच्या तुकड्या
३५ हजार ६२६ – पोलिस, अन्य कर्मचारी
१९ हजार – होमगार्ड











