राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकाटेंवर कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता असताना ही भेट झाल्याने मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.






माणिकराव कोकाटे कृषीमंत्री असताना शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिकांच्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांना प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. या निर्णयामुळे कोकाटेंच्या अडचणीत मोठी भर पडली असून त्यांच्यावर अटक वॉरंट काढले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणात मुख्यमंत्री कोट्यातून देण्यात येणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवजांच्या आधारे लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणी क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला होता. याशिवाय दुसऱ्या प्रकरणात १० हजार रुपयांच्या दंडासह दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा देखील न्यायालयाने कायम ठेवली आहे.
दरम्यान, या न्यायालयीन निर्णयानंतर आजच कोकाटेंवर अटक वॉरंट निघू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. जरी या भेटीमागील नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट झाले नसले, तरी कोकाटेंच्या राजीनाम्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जर न्यायालयीन आदेशानुसार पुढील कारवाई झाली, तर माणिकराव कोकाटेंना मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे महायुती सरकारसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून पुढील काही तासांत काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.











