पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणारा उड्डाणपूल भैरोबा नाला ते यवत असा उभारण्यास राज्य सरकारच्या पायाभूत समितीने मंगळवारी मान्यता दिली. त्यामुळे आता भैरोबानाला-हडपसर ते यवत असा सहापदरी उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असून हडपसर ते यवतपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असल्याने या दरम्यान प्रवासासाठी नागरिकांना बराच वेळ लागतो. अनेक वेळा नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हडपसर ते यवत दरम्यान सहापदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता.






जून महिन्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता दिली होती. तसेच सध्या अस्तित्वातील रस्त्याचे रुंदीकरण करून तो रस्ताही सहापदरी करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत समितीची बैठक झाली.
त्यामध्ये सोलापूर रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी हडपसरऐवजी भैरोबानाला येथून उड्डाणपुलाचे काम सुरू करावे, यावर चर्चा करून त्यास मान्यता दिली. त्यामुळे उड्डाणपुलाची लांबी सुमारे साडेचार किलोमीटरने वाढणार आहे, अशी माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.
सविस्तर माहिती
- ३९ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल होणार
- प्रकल्पासाठी पाच हजार २६२ कोटींच्या खर्चास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे.
- प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत बीओटी तत्त्वावर केले जाणार.
- काम पूर्ण झाल्यावर सर्व वाहनांसाठी टोल आकारण्यात येणार.
- ठेकेदार कंपनीला कामाचा आदेश दिल्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीत हे काम पूर्ण करणे बंधनकारक.
- या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे













