पुणे महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र येऊन भाजपला रोखावे, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असून त्यासाठी नेत्यांवर प्रचंड दबाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील दोन माजी महापौरांनी अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्याशी गेल्या आठवड्यात सुमारे दीड तास बंद दारात बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक अत्यंत गुप्त ठेवली गेली असली तरी पक्षांतर्गत वर्तुळात तिची जोरदार चर्चा सुरू आहे.






शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या आघाडी बाबत फारसे सकारात्मक नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढणार आहोत. काँग्रेसचे पुणे प्रभारी सतेज पाटील आणि ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याशी याबाबत आमचे बोलणे अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडी एकसंघ राहिल आणि पुण्यातही तेच चित्र दिसेल.”
दुसरीकडे, अजित पवार गटातील अनेक ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकारी मात्र एकटे लढण्याच्या मनःस्थितीत नाहीत. भाजपने त्यांना सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे, तर महाविकास आघाडीत काँग्रेस-ठाकरे गटाने अजित पवारांना घेण्यास देण्यास कडवा विरोध केला आहे. परिणामी अजित गटासमोर मोठी कोंडी निर्माण झाली आहे.
अजित पवारांना पुण्यातील नेत्यांना स्वबळावरती निवडणूक लढण्याची तयारी सुरू करा अशा सूचना दिल्या आहेत. मात्र स्थानिक नेत्यांचं भाजप नाही तर किमान शरद पवार गटाशी समेट करा” असा रेटा आहे. तेच शरद पवार गटातील काही बड्या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडेही “पुणे तरी एकत्र लढूया, भाजपला रोखणे गरजेचे आहे” अशी विनंती केली आहे.
मात्र दोन्ही बाजूंचे वरिष्ठ नेते (शरद पवार आणि अजित पवार) हा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवून माघार घेताना दिसत आहेत. त्यामुळे आता पुण्यातील स्थानिक समीकरण आणि कार्यकर्त्यांचा दबाव यांच्यावरच दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य आघाडीचे भविष्य अवलंबून आहे. सध्या तरी चेंडू पुण्यातील दोन्ही गटांच्या स्थानिक नेत्यांच्या कोर्टात आहे; पण याचे हे पुढच्या १५-२० दिवसांत स्पष्ट होईल, असे बोल जात आहे.












