बारामती नगर परिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून गेल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पण दुसरीकडे सत्ताधार्यांच्या ‘बिनविरोध पॅटर्न’ची महाराष्ट्रात चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार बिनविरोध कसे होतात? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केला आहे.






राष्ट्रवादीने प्रतिस्पर्धी उमेदवारांना पैसे देऊन अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले, असा सनसनाटी आरोप युगेंद्र पवार यांनी केला. बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने प्रचाराला प्रारंभ केला. या प्रचारात युगेंद्र पवार यांनी सहभाग नोंदवून उमेदवारांचे मनोधैर्य वाढवले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. सामान्य माणसं घाबरतात बरेच लोक हे मुद्दाम करण्यासाठी येतात.
कारण पैशांची सवय गेल्या काही वर्षांपासून सत्ताधार्यांनी लावली आहे. एक तर पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. आमचे उमेदवार हे सर्व छोटे व्यवसायिक आहेत. आपण उच्च शिक्षित, उच्च प्रतिमा असलेले तरुण सामाजिक कुटुंबातील उमेदवार दिलेले आहेत. प्रतिस्पर्थ्यांनी दबाव आणला की लोक घाबरतात. आमच्यासमोर खूप मोठी शक्ती आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, संस्था आहेत.
हे सगळे तिथे काम करत असतात. त्यांच्यावर दबाव आणला जात असेल तर मग दोन-तीन लोक जाणार हे साहजिक आहे. शेवटी लहान माणसाला भीती वाटते. जो सामान्य घरातला असतो, तो घाबरून जातो. आमच्या उमेदवारांवर प्रचंड दबाव आणला जात आहे. लोकसभेला विधानसभेला आपल्याला बघायला मिळाले. आता नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील बघायला मिळत आहे.













