रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या दोघेही फक्त एकदिवसीय सामने खेळत आहेत. दोघेही आगामी एकदिवसीय विश्वकप स्पर्धेत खेळणार की नाही?याबाबतही अद्याप अस्पष्टता आहे. पण जर त्यांना आगामी विश्वकप स्पर्धेत खेळायचं असेल त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागणार आहे, याबाबत बीसीसीआयने त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे.






बीसीसीआयने खेळाडूंना खाली वेळेत देशांतर्गत खेळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड मॅनेजमेंटने त्यांनी यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे रोहितने आपण विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचं मुंबईच्या संघाला कळवलं आहे. मात्र, विराटने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने दोघांनाही स्पष्ट केले आहे की जर दोघांना भारतासाठी खेळायचे असेल तर त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. ते दोघेही दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्त झाले असल्याने, मॅच-फिट राहण्यासाठी त्यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे.
अशातच भारतीय संघ 3 ते 9 डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यानंतर 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी विजय हजारे ट्रॉफी हा एकमेव पर्याय दोघांपुढे आहे. या दोन्ही खेळाडू विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोघांनी गेल्या हंगामात प्रत्येकी एक एक रणजी सामना खेळला आहे.












